राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सतत वादग्रस्त विधान करत राहिल्याने त्यांची पदावरून हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रपतींकडे करत आलो आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना स्वेच्छेने मुक्त न होऊ देता, राष्ट्रपतींनी त्यांची हकालपट्टी करावी, अशी आमची मागणी असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले हे पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी सदर विधान केले. आपल्याला पदमुक्त व्हायचे आहे, अशी इच्छा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मुंबई भेटीत व्यक्त केली आहे. तर राजभवनाकडून एक पत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्या प्रश्नावर नाना पटोले म्हणाले की, राज्यपाल भवन हे भाजप भवन झाले होते. ही भूमिका आजपर्यंत सातत्याने मांडत होतो. हे राज्यपालांच्या पत्रातून स्पष्ट झाल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात संवैधानिक व्यवस्थेला छेद लावण्याचे काम राज्यपालांनी केले आहे. भाजपाला अधिकाधिक फायदा कसा होईल यावर त्यांनी अधिक काम केल आहे. तसेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल जे विधान केले आहे त्यामधून त्यांच्या मनात किती पाप आहे हे यातून दिसत आहे.
हेही वाचा – “भाजपाचा प्रस्ताव काय येतो, त्यावर आपण बोलू”; कसबा पोटनिवडणुकीवर नाना पटोलेंचे विधान
हेही वाचा – पुणे : लोणावळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ, सहारा पूल परिसरात युगुलाला लुटले
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीला शुभेच्छा
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये युती झाली. त्या प्रश्नावर ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीला आमच्या शुभेच्छा आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझे सकाळी बोलने झाले असून, आमची भूमिका मांडली आहे. प्रकाश आंबेडकर यांचा प्रस्ताव आल्यानंतर आमचा प्रस्ताव देणार आहोत. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आला नसल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.