पुणे : राज्यातील काही महापालिकांनी 15 ऑगस्टला कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आल्यानंतर विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर टीका करण्यास सुरुवात केली. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. तर केडीएमसीच्या मांस विक्री बंदी निर्णयाविरोधात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक होत केडीएमसी मुख्यालयाच्या परिसरात हातात कोंबड्या घेऊन आंदोलन केले. यावेळी सरकार आणि केडीएमसीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
दरम्यान पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघात ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख डॉ. अमोल देवळेकर यांनी एक हजार कुटुंबांना प्रत्येकी एक किलो चिकन वाटप करण्याचा निर्णय घेतला. या आयोजित केलेल्या कार्यक्रमानिमित्त समर्थ पोलीस स्टेशनकडून डॉ.अमोल देवळेकर यांना नोटीस देखील बजावण्यात आली आहे.
त्या पार्श्वभूमीवर डॉ.अमोल देवळेकर म्हणाले, देशातील प्रत्येक नागरिकाला आपण कसे राहावे, काय खावे याबाबत संविधानाने दिलेला अधिकार आहे. पण 15 ऑगस्टला कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती समोर आली आहे. या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. कोणत्या दिवशी काय खावे आणि काय खावू नये, असे सांगून राज्य सरकार आमच्यावर निर्बंध आणत असतील, तर हे योग्य नसून त्या पार्श्वभूमीवर 1 हजार नागरिकांना प्रत्येकी एक किलो चिकन वाटप करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.