पिंपरी : मद्यपान केल्यानंतर वाद घालून एका युवकाला पुलावरून इंद्रायणी नदीच्या पात्रात फेकले. ही घटना कुरूळी गावाच्या हद्दीत जुन्या इंद्रायणी नदीच्या पुलावर घडली. याबाबत सिद्धार्थ भानुदास बोडके (३७, मोशी) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहन तुकाराम जाधव (३४, मोशी) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला मद्यपान करण्यासाठी बोलावले. रिक्षात बसवून त्याला मोशीत येथे नेले आणि मद्यपान करायला लावले. त्यानंतर त्याने फिर्यादीसोबत शिवीगाळ करत वाद घातला. वादाचे रूपांतर भांडणात झाल्यावर आरोपीने त्याला रिक्षात बसवून जुन्या इंद्रायणी नदीच्या पुलावर आणले. तिथे पुन्हा वाद घालून रिक्षातून बाहेर ओढले. त्याने हाताने मारहाण केली आणि गाडीतील लोखंडी गज काढून मारू लागला. गजाचा फटका फिर्यादीच्या डाव्या हाताच्या मनगटाजवळ लागला. त्यानंतर आरोपीने जिवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीला उचलून पुलावरून इंद्रायणी नदीपात्रात फेकून दिले. म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस तपास करत आहेत.

तळेगाव दाभाडेत वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत, दोघांना अटक

वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांना दोघांनी अरेरावी करत त्यांच्या शासकीय कामात अडथळा आणला. ही घटना रविवारी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोमाटणे फाटा शिरगाव रोडवर घडली.

या प्रकरणात पोलीस कर्मचारी प्रशांत खेडकर (४२, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओंकार अविनाश क्षिरसागर (२९, तळेगाव दाभाडे) आणि शुभम सावळेराम गावडे (२९, वराळे) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि इतर वाहतूक पोलीस कर्मचारी वाहतूक नियंत्रित करत असताना आरोपी ओंकार याने दुचाकी रस्त्यात उभी करून “तुम्हाला ट्राफिक काढता येत नाही का?” असे बोलून वाद घातला. त्याने “तुमच्याकडे कोणता आदेश आहे? मी तुमचा व्हिडिओ काढून सीपी साहेबांना पाठवून व्हायरल करतो” अशी धमकी दिली. त्याने पोलीस हवालदार बळीराम चव्हाण यांच्यासोबत धक्काबुक्की आणि मारहाण केली. आरोपी शुभम यानेही अरेरावीची भाषा वापरत त्यांना दमदाटी केली. तळेगाव दाभाडे पोलिस पुढील तपास करत आहेत.

रुग्णालयाजवळून मोबाईल हिसकावला

वायसीएमएच रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरून तरुणाच्या हातातून मोबाईल हिसकावल्याची घटना घडली. याबाबत विशाल सुनील गायकवाड (२७, चिखली) यांनी संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तुषार सुभाष कांबळे (२४, निगडी) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल हे त्यांच्या बहिणीसाठी आणि तिच्या मुलासाठी जेवण आणण्यासाठी रुग्णालयबाहेर गेले होते. जेवण घेऊन परत येत असताना ते मोबाईलवर बोलत होते. त्याच वेळी आरोपीने त्यांच्या जवळ येऊन त्यांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला आणि पळून गेला. संत तुकाराम नगर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

तडीपार गुंडाकडून गांजा जप्त

पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या एकाला बेकायदेशीररित्या तीन किलोहून अधिक गांजा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. ही कारवाई सोमाटणे फाटा ते परंदवडी रोडवर करण्यात आली. याबाबत पोलीस हवालदार प्रशांत पवार यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय घनश्याम भालेराव (३१, रावेत) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी अक्षय भालेराव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे ३१२३ ग्रॅम वजनाचा, १,५६,१५० रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्रीसाठी बाळगलेला आढळून आला. आरोपीला यापूर्वीच पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. तरीही त्याने तडीपारीचा आदेश रद्द न करता किंवा परवानगी न घेता शहरात प्रवेश केला. आरोपीने हा गांजा धुळे येथून स्वतः जाऊन आणल्याचे सांगितले आहे. तळेगाव दाभाडे पोलिस तपास करत आहेत.