आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या चिंचवडच्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीने ही निवडणूक लढण्याची भूमिका घेतली असून, राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेसाठी नाना काटे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत नाना काटे यांचा उमेदवारी अर्जही दाखल करण्यात आला. दरम्यान, स्थानिक प्रभावी नेते राहुल कलाटे यांनीही ही निवडणूक अपक्ष लढण्याचा निर्धार केला आहे. यामुळे महाविकास आघाडीसमोर राजकीय संकट निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार म्हणाले, “दोन जागा होत्या त्यापैकी कसबा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीने काँग्रेसला दिली. तर आज आम्ही सर्वांनी नाना काटे यांचा अर्ज दाखल केलेला आहे. उद्या अर्ज छाणणी आहे, त्यानंतर अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. काल रात्री उशीरापर्यंत आम्ही या ठिकाणी उमेदवारीसंदर्भात तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत होतो. परंतु दुर्दैवाने यावर एकमत झालं नाही. मग सकाळी मीर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. माझं बाळासाहेब थोरातांशीही बोलणं झालं आणि त्यांना आज आम्ही नाना काटे यांचा अर्ज दाखल करत असल्याचे मी सांगितले. आमच्याकडे ज्यांनी उमेदवारी मागितली होती, त्यांनी शांत रहावं म्हणून आम्ही प्रयत्न सुरू ठेवणार आहोत, शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न असतो. राहुल कलाटेंना भेटायलाही काहीजण गेले होते. परंतु त्यांची काय चर्चा झाली हे मला अद्याप समजले नाही.”

हेही वाचा – “हे ज्यांना बाप मानतात त्या व्यक्तीने देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या…” जितेंद्र आव्हाडांवर भाजपाचे टीकास्र!

याचबरोबर, “पंढरपूरची निवडणूकही लढली गेली, कोल्हापूरची निवडणूकही लढली गेली. देगलूरची निवडणूकही लढली गेली. फक्त अपवाद आहे तो मुंबईचा आणि मुंबईची जी पोटनिवडणूक झाली त्यामध्ये मात्र आवाहन केल्यानंतर प्रमुख पक्षांनी तिथं उमेदवारी दिली नाही. आम्ही आणि शिवसेना, काँग्रेस सर्वांशी चर्चा करत होतो, त्यावेळी असं सर्वांचं मत आलं की ही निवडणूक लढवावी, त्यामुळे आम्ही अर्ज दाखल केलेला आहे.” असंही अजित पवार म्हणाले.

याशिवाय, “राहुल कलाटेंना सांगण्याचं आम्ही काम करू, ऐकायचं नाही ऐकायचं हा त्याचा निर्णय आहे. मला मात्र उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितल आहे की, आपला महाविकास आघाडीचा उमेदवार नाना काटे यांना शिवसेनेचा स्पष्ट पाठिंबा राहील. एक नक्कीच सांगेन हलक्यात घेतली तर निवडणूक सोपी नाही. परंतु कष्ट घेतले तर निवडणूक अवघडही नाही. या शहराचा अनेक वर्षांपासून संबंध आहे. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच पिंपरी-चिंचवडमधून झाली आहे.”

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad we will try to keep calm those who asked us for candidacy ajit pawar msr
First published on: 07-02-2023 at 13:52 IST