छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान, औरंगजेब व शाहिस्तेखान यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेक ठिकाणी निदर्शने करून आव्हाडांच्या विधानाचा निषेध व्यक्त केला. मात्र आव्हाड त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. तर भाजपाकडूनही त्यांच्यावर जोरदार टीका सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाने पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाडांवर ट्वीटद्वारे टीकास्र सोडले आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही जितेंद्र आव्हाड सारख्या विकृती महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलेल्या होत्या. स्वतःला पद, पैसा, सत्ता मिळणार असेल तर विचारधाराच काय, प्रसंगी धर्मांतर करून औरंगजेब वारस मीच आहे सांगण्यात देखील कमी करणार नाहीत. आव्हाड सारख्या विकृतीच्या तोंडून महान महापुरुषांची नावे येतात, त्यातून असा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, जणू एक थोर समाजसेवकच बोलतो आहे. पण या विकृत वाणाची कथनी वेगळी आणि करणी वेगळी आहे.” असं भाजपाने म्हटलं आहे.

याशिवाय, “इशरत जहा नामक अतिरेकी महिलेच्या नावाने अॅम्ब्युलन्स सुरू करणे, आघाडी सरकारच्या काळात यांनीच तुरुंगात घातलेल्या नक्षलवाद्यांच्या सुटकेसाठी आकांडतांडव करणे, स्वतःच्या आयुष्यात कधी दोन चांगल्या ओळी खरडता आल्या नसल्या तरी दुसऱ्या मोठ्या विचारवंतांना पातळी सोडून दूषणे देणे, अफझलखान, औरंगजेब यांचेच वंशज आहेत अशा पद्धतीने त्यांचे उदात्तीकरण करणे हे यांचे नेहमीचे उद्योग आहेत. घसा फाटेपर्यंत माध्यमांशी गप्पा मारताना यांची अवस्था सिल्व्हर ओकच्या घरातील घरगड्यासारखी आहे. हे महाराष्ट्राला माहीत आहे. शरद पवारांनी उठ म्हटलं की उठयाच आणि गप म्हटलं की गप बसायचं. हे ज्यांना बाप मानतात त्या व्यक्तीने देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण करून, महाराष्ट्रात जातीजातीत भांडणे लावण्यासाठी आव्हाड सोबत अमोल मिटकरी व इतर जातीयवादी संघटना दिमतीला ठेवले आहेत.” असाही भाजपाने आरोप केला आहे.

याचबरोर, “सध्या जितेंद्र आव्हाडांच्या मतदारसंघात मुस्लिम समाजातील इच्छुक उमेदवार तयार झाल्याने त्या मुस्लिम समाजाची मते मिळावीत म्हणून आव्हाड दिवसेंदिवस विकृतीचा कळस गाठत आहेत. मुस्लिम मतदारांना खुश करण्यासाठी यांनी महाराजांचा अपमान करण्याचा सपाटा लावला आहे. बाकी या हिंदू द्वेष्ट्या पिलावळीचा वैचारिक आदर्श औरंगजेब असला तरी, यांची वैचारिकची बोटं छाटायला छत्रपतींचे मावळे महाराष्ट्राच्या भूमीत कायम असणार हे औरंगजेबाच्या वारसदारांनी कायम लक्षात ठेवावं!” असा इशारा भाजपाने दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते? –

महाराष्ट्र सन्मान परिषदेत बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “एमपीएसीमधूम महाराष्ट्राचा इतिहास हा विषयच गायब करून टाकला. एके दिवशी तावडेंनी विधानसभेत सांगितलं की, आम्ही पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकणार. मग मी म्हटलं की, मग शिवाजी महाराज गोट्या खेळत होते, असे दाखवणार का? समोर औरंगजेब ठेवला म्हणून शिवाजी महाराज आहेत. अफजलखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. शायिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत. यातूनच शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवतात हे जगासमोर आहे.”