पुणे : ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच समाज माध्यमांवर प्रदर्शित झाला. त्यानंतर अनेक संघटनांकडून चित्रपटाला विरोध करण्यात आला. चित्रपटातील अनेक दृश्यांमध्ये इतिहासाचा विपर्यास झाल्याचा आरोप करण्यात आला. आता पुण्यात श्री शिव शंभू विचार मंचानेही यावर आक्षेप घेतला आहे. चित्रपटात ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे आणि खोटे दावे करण्यात आल्याचा आरोप संघटनेच्या वतीने बुधवारी पत्रकार परिषदेत करण्यात आला.
नवी पेठेतील पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेला संघटनेचे राज्य संयोजक सुधीर थोरात, अखिल भारतीय पंच रामनंदी निर्वाणी आखाड्याचे महंत सुधीर दास महाराज, लेखक वक्ते सौरभ कर्डे आदी उपस्थितीत होते.
थोरात म्हणाले, ‘‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटात चुकीचे ऐतिहासिक संदर्भ देण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात ३५ टक्के मुसलमान होते, महाराजांचे ३५ पैकी ११ अंगरक्षक मुस्लिम होते, महाराजांनी रायगड किल्ल्यावर मशिद बांधली, असा चुकीचा इतिहास ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या दाव्यांची पुष्टी करणारे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत, असे आमचे मत आहे. त्यामुळे चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी सदर संदर्भ आणि पुरावे दिल्याशिवाय शासनाने हा चित्रपट कोणत्याही माध्यमांवर प्रसारित करू नये, अशी आमची मागणी आहे.’
‘चित्रपटाच्या ट्रेलरमधेच इतके दोष असतील तर संपूर्ण चित्रपट हा समाजाची वैचारिक दिशाभूल करणारा असेल, नवीन पिढ्यांमध्ये इतिहासाबद्दल गैरसमज निर्माण करील. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यासाठी खरे योगदान आणि बलिदान देणाऱ्या मावळ्यांचे श्रेय दुसऱ्याच कुणाला तरी देण्याचा हा विश्र्वासघातकी प्रयत्न आहे,’ असा आरोपही त्यांनी या वेळी केला.
महंत सुधीर दास महाराज म्हणाले, ‘शासनाने अशा प्रकारच्या चित्रपटांवर बंदी घालावी. या चित्रपटाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. रायगड किल्ल्याची जागतिक वारसा स्थळात नोंद झाली आहे. त्या स्थळाबाबत अत्यंत चुकीचा संभ्रम चित्रपट माध्यम व समाज माध्यम यावर पसरविण्याचे हे पूर्वनियोजित षडयंत्र आहे. त्यामुळे त्याची सखोल चौकशी करण्यात यावी.’
‘शासनाच्या सांस्कृतिक विभागाने हा चित्रपट पुरस्कारासाठी पाठवला असेल, तर त्याबाबतही सरकारला नक्कीच विचारणा करू,’ असेही त्यांनी यावेळी सांगितले.
चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी ऐतिहासिक संदर्भ आणि पुरावे दिल्याशिवाय शासनाने हा चित्रपट प्रसारित करू नये. चित्रपटाच्या ट्रेलरमधेच इतके दोष असतील, तर संपूर्ण चित्रपट हा समाजाची वैचारिक दिशाभूल करणारा असेल, त्याने नवीन पिढ्यांमध्ये इतिहासाबद्दल गैरसमज निर्माण होतील. – सुधीर थोरात, राज्य संयोजक, श्री शिव शंभू विचार मंच