पुणे : ‘बुझी शमा भी जल सकती है, तुफान से कश्ती भी निकल सकती है, होके मायूस यू ना अपने इरादे बदल, तेरी किस्मत कभी भी बदल सकती है’, असे सांगत जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी यापुढेही पक्षासमवेत राहण्याचा निर्धार बुधवारी प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत केला. नेते येतील आणि जातील. मात्र, कार्यकर्ते निष्ठेने पक्षात राहतील, असा विश्वासही या वेळी व्यक्त करण्यात आला.
पुरंदरचे माजी आमदार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी बुधवारी सासवड येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवन येथे जिल्हा काँग्रेसची तातडीची बैठक पार पडली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश सरचिटणीस ॲड.अभय छाजेड यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. तसेच खेड, शिरूर, दौंड, वेल्हा, खडकवासला, बारामती, हवेली अशा विविध तालुक्यांतील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘सत्तेच्या लालसेपोटी, स्वत:च्या फायद्यासाठी नेते पक्षाला सोडून जात आहेत. सध्या पक्षाची असलेली अवस्था एकेकाळी भाजपची देखील होती. नेते येत-जात असतात. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन युवा कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्षपदाची संधी द्यावी,’ अशी एकमुखी मागणीही कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्याकडे केली.
‘पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व टिकवायचे असल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात. काँग्रेसमधून सत्ताधारी पक्षात गेलेल्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढल्यानंतर पक्षातीलच वरिष्ठ नातीगोती, जवळचे संबंध असल्याचे सांगून कार्यकर्त्यांना गप्प करतात,’ अशी तक्रारही कार्यकर्त्यांनी केली.
प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले, ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी नको, अशी स्थानिक कार्यकर्त्यांकडून मागणी झाल्यास प्रदेश पातळीवरून तशी सक्ती केली जाणार नाही. वाईट काळात पक्षाबरोबर असलेल्यांच्या मागे पक्षाची ताकद कायम राहील. येत्या काही दिवसांमध्ये जिल्हाध्यक्षपदाची नियुक्ती पूर्ण करण्यात येईल.’
दरम्यान, ‘पक्षाची रचना पिरॅमिडसारखी न राहता विकेंद्रीकरण करावे लागेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघनिहाय एका आराखडा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तयार करावा,’ अशी सूचनाही सपकाळ यांनी केली.
‘खुर्चीलादेखील वाईट वाटले’
हर्षवर्धन सपकाळ यांचे भाषण सुरू असताना पहिल्या रांगेतील एक पदाधिकारी खुर्चीवरून खाली कोसळला. हा संदर्भ घेऊन ‘सत्ता दिली, पद दिले, सर्व काही दिले असताना आणि आता पक्षाला सोडून जात आहेत. त्यामुळे खुर्चीला देखील वाईट वाटले म्हणून ती देखील कोसळली.’ असे विधान सपकाळ यांनी केले.