Pune Municipal Corporation Mission 15 : शहरातील वाहतुकीचा वेग वाढविण्यासाठी प्रमुख रस्त्यांच्या डागडुजीसाठी महापालिकेने ‘मिशन १५’ अंतर्गत हाती घेण्यात आलेली रस्त्यांची कामे ९० टक्के पूर्ण झाली आहेत, असा दावा पथ विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. ‘मिशन १५’ मध्ये काम करण्यात आलेल्या रस्त्यांवर यापुढील काळात खोदाई करण्याची कोणतीही परवानगी दिली जाणार नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय झाल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. जागोजागी रस्ता खराब झाल्याने वाहतुकीचा वेग देखील मंदावला होता. काही ठिकाणी रस्त्यावर चढ-उतार झाला होता. त्यामुळे महाालिकेने या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी शहरातील ज्या रस्त्यांचा वापर सर्वात अधिक होतो, असे १५ रस्ते महापालिकेने पहिल्या टप्प्यात निवडले होते. या प्रमुख रस्त्यांवरील खराब झालेल्या रस्त्याची डागडुजी करून त्यावर डांबरीकरण करण्यात आले. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

पथ विभागाने गेले महिनाभर केलेल्या विविध रस्त्यांच्या कामाची माहिती देण्यासाठी पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पाहणी दौऱ्यामध्ये शहरातील विविध रस्तांवर करण्यात आलेली कामे दाखविण्यात आली. पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका महिन्यात प्रमुख १५ रस्त्यांच्या डागडुजीचे काम पूर्ण केले असून एकूण ९२ किलोमीटरच्या रस्त्यांवर ६० हजार ७७२ चौरस मीटरचे डांबरीकरण करण्यात आले आहे. यासाठी सुमारे ११ हजार १४३ मेट्रीक टन डांबराचा वापर करण्यात आला आहे. तर काही महत्त्वाच्या चौकांमध्ये थर्मोप्लास्टिक पेंटचा वापर करून डांबरीकरण करण्यात आल्याची माहिती पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

पथ विभागाने केलेल्या रस्त्यांच्या कामामुळे वाहतुकीसाठी लागणारा विलंब कमी होणार असून वाहनचालकांना दिलासा मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या आमदारांची महापालिका आयुक्तांबरोबर बैठक झाली होती. त्या बैठकीत शहरातील रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर पालिकेने ‘मिशन १५ ’ मोहीम हाती घेतली होती.

पालकमंत्री अजित पवार यांनीही रस्ते सुधारण्याची सूचना केली होती. त्यानुसार पथ विभागाने कामाला जोरदार सुरुवात केली. एका महिन्याच्या काळात पथ विभागाने निश्चित केलेले रस्त्यांच्या डागडुजीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. या अभियानांतर्गत डागडुजी करताना रस्ते खरवडून काढून त्यावर डांबरीकरण करण्यात आले. पदपथांची रंगरंगोटी, डागडुजी यांसह चेंबर दुरुस्तीची कामेदेखील यामध्ये पूर्ण करण्यात आली आहेत.

रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी कमी होऊन वेग वाढावा यासाठी महापालिकेचा पथ विभाग आणि वाहतूक पोलिसांनी एकत्रित पाहणी करून वाहतुकीला अडथळा ठरणारे गतिरोधक काढून टाकले. त्यानंतर या १५ रस्त्यांवर डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आहे. रस्त्यांवरील ड्रेनेजच्या चेंबरची झाकणे वरखाली असल्याने वाहनचालकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो.

चेंबरमुळे पडणाऱ्या खड्ड्यांमुळे अपघात होतात, तसेच पाठदुखी, कंबरदुखी याचा त्रास देखील नागरिकांना सहन करावा लागतो. पथ विभागाने ड्रेनेज चेंबरची झाकणे समपातळीत आणण्याची मोहीम हाती घेत शहरातील विविध रस्त्यांवरील ५०९ चेंबर समपातळीवर आणण्याचे काम केले आहे.

महापालिकेचे पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग वाढविण्यासाठी शहरातील वाहनचालकांकडून दैनंदिन सर्वाधिक वापर होणारे ३२ रस्ते निवडण्यात आले आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात १५ रस्ते विकसित करण्याचे काम पूर्ण होत आहे. मुख्य रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यात आले, चेंबर समपातळीवर आणले. डांबरीकरण केले. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित १७ रस्त्यांची कामे केली जातील. काम झालेल्या रस्त्यांवर खोदाई करता येणार नाही.

ही कामे झाली पूर्ण

  • नगर रस्ता – पर्णकुटी चौक ते वाघोली बकोरी फाटा
  • सोलापूर रस्ता- वानवडी चौक ते आकाशवाणी मांजरी चौक
  • मगरपट्टा रस्ता – मगरपट्टा चौक ते खराडी बायपास चौक
  • पाषाण रस्ता – पुणे विद्यापीठ चौक ते पाषाण बावधन सर्कल चौक
  • बाणेर रस्ता- पुणे विद्यापीठ चौक ते सदानंद हॉटेल चौक
  • संगमवाडी रस्ता – सीओईपी चौक ते पर्णकुटी चौक
  • विमानतळ व्हीआयपी रस्ता- पुणे विमानतळ ते गुंजन चौक
  • कर्वे रस्ता- खंडोजी बाबा चौक ते वारजे चौक
  • पौड रस्ता – पौड फाटा चौक ते चांदणी चौक
  • सातारा रस्ता – स्वारगेट चौक ते गुजरवाडी चौक
  • सिंहगड रस्ता – लक्ष्मी मंदिर चौक ते नांदेड सिटी चौक
  • बिबवेवाडी रस्ता – पुष्पमंगल चौक ते अप्पर बस डेपो चौक
  • नॉर्थ मेन रस्ता – कोरेगाव पार्क पेट्रोल पंप ते गुप्ता चौक
  • गणेशखिंड रस्ता – सीओईपी चौक – पुणे विद्यापीठ चौक
  • छत्रपती शिवाजी-बाजीराव (वारसा चाल) – स्वारगेट चौक ते शिमला ऑफिस चौक शनिवारवाडा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune municipal corporation mission 15 ban on digging on roads dcm ajit pawar order to pmc pune print news ccm 82 css