पुणे : भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात वीजचोरी करण्यात आल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. या प्रकरणी महावितरणकडून कारवाई करण्यात येत नसल्याने महावितरणच्या रास्ता पेठ येथील मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सौरभ आमराळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रथमेश आबनावे, आनंदकुमार दुबे, किशोर मारणे, उमेश पवार, सागर धाडवे, मेघश्याम धर्मावत, राज जाधव आदी उपस्थित होते.
‘महापालिकेने एका महिन्यापूर्वी साने गुरुजी तरुण मंडळाला सागर धाडवे यांच्याकडील व्यायामशाळा चालवायला दिली. त्याचा राग मनात ठेवून हा आरोप करण्यात येत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदनामी करण्याचा प्रयत्न असून, आरोपात तथ्य नाही,’ असे घाटे यांनी सांगितले.