पुणे : गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया,पुढच्या वर्षी लवकर या,या जयघोषात आपल्या लाडक्या गणरायाची मिरवणुक काढून ढोल ताशाच्या गजरात आपण सर्वांना भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप दिला.तर पुण्यातील गणेशोत्सवाचा आगमन आणि विसर्जनाची मिरवणुक पाहण्यास राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येत असतात.यंदा देखील पुण्यातील लक्ष्मी रोड,टिळक रोड,कुमठेकर रोड आणि केळकर रोड या रस्त्यावर विसर्जन मिरवणुक पाहण्यास हजारो नागरिकांनी एकच गर्दी केली होती.काल सकाळी महात्मा फुले मंडई येथून सुरू झालेली विसर्जन मिरवणुक डेक्कन येथील विसर्जन घाटावर पोहोचण्यास तब्बल ३२ तास २६ मिनिटाचा कालावधी लागला. त्यामुळे यंदाची विसर्जन मिरवणुक ही विक्रमी चालली.
महात्मा फुले मंडई येथून काल सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी मानाचा पहिला कसबा गणपतीला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. कालच मानाच्या पाच गणपतीचे ५ वाजून ४० मिनिटांपर्यत विसर्जन करण्यात आले.त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे ९ वाजून २५ मिनिटांनी विसर्जन झाले.तर रात्री बारानंतर लक्ष्मी रोड,टिळक रोड,कुमठेकर रोड आणि केळकर रोडवर या चार रस्त्यावरील डीजे मिरवणुक आहे त्या जागी थांबल्या होत्या. त्यानंतर सकाळी ६ वाजता या रस्त्यावरील मिरवणुक सुरू झाल्यानंतर नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
साडे पाचवाजेपर्यंत अलका टॉकीज चौकातून सर्व मिरवणुका डेक्कन येथील विसर्जन घाटाच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. त्यानंतर अखेरच्या मंडळाचे ६ वाजता विसर्जन करण्यात आले.त्यानुसार पुण्यातील विसर्जन मिरवणुक ही तब्बल ३२ तास २६ मिनिटाचा कालावधी लागल्याचे स्पष्ट झाले.या मिरवणुकी बाबत पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले, गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी प्रत्येक विभागनिहाय गणेश मंडळाच्या बैठका घेतल्या.त्यामुळे कार्यकर्त्यांसोबत चांगला संवाद झाला.त्यामुळे मिरवणुक अधिक चांगल्या प्रकारे पार पडली.पण काही मंडळांनी मध्ये अंतर पडल्याने आणि काही घटना घडल्या.त्यामुळे मिरवणुकाला अधिक तास लागल्याची कबुली त्यांनी दिली.