पुणे : पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून, कुंभारवळण येथील स्थानिक नागरिकांनी भूसंपादनाला विरोध करण्यासाठी दगडफेक केली असता, पोलिसांनी लाठीमार आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामध्ये आंदोलकांसह पोलीसही जखमी झाले. स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये शनिवारी दुपारी साडेतीन वाजता झालेल्या या धुमश्चक्रीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. या प्रकारानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी भूसंपादनाला तात्पुरती स्थगिती दिली.

जिल्हा प्रशासनाने पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. एखतपूर या गावातील सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले. कुंभारवळण या गावातील सर्वेक्षणाचे शनिवारी काम सुरू असताना संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. ग्रामस्थ आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. ग्रामस्थांनी बंदोबस्तासाठी असलेले पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या पथकावर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या प्रकारात ग्रामस्थ आणि काही अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी जखमी झाले.

‘या घटनेत येथील नागरिक जखमी झाले, ही बाब अतिशय वेदनादायी आणि अस्वस्थ करणारी आहे. शासनाने जनतेच्या भावना लक्षात घेऊन संयम व संवेदनशीलता दाखविणे आवश्यक होते. शासनाने हा विषय संवेदनशीलतेने हाताळावा,’ अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले, ‘जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक शनिवारी या भागात जमीन मोजणीसाठी आले. अनुचित घटना घडण्याची शक्यता गृहीत धरून या भागातील बंदोबस्त वाढवण्यात आला होता. मोजणीचे काम सुरू असताना ग्रामस्थ आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. ग्रामस्थांनी मोजणीस विरोध केला. दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे कर्मचाऱ्यांचे पथक तेथून जात असताना दगडफेक करण्यात आली. त्यानंतर संभाव्य अनुचित घटना रोखण्यासाठी सौम्य लाठीमार करण्यात आला. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या.’

सात गावांत भूसंपादन; ग्रामस्थांचा विरोध

पुरंदर येथील नियोजित विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील सात गावांमधील सुमारे २८३२ हेक्टर भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यामध्ये वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव मेमाणे यांचा समावेश आहे. या विमानतळाला काही ग्रामस्थांचा विरोध आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी विरोध करून प्रशासनाला निवेदने दिली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमानतळ नियोजित जागी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. महिनाभरापूर्वी याबाबतची अधिसूचना काढली आहे. त्यानंतर भूसंपादनासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू करण्यात आले.

घटनेनंतर ग्रामस्थांनी सासवड पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. या भागातील परिस्थिती नियंत्रणात असून, बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण

भूसंपादनाबाबत सात दिवसांपूर्वी नोटिसा दिल्या होत्या. सर्वेक्षणाचे काम सुरू असताना पोलिसांच्या अंगावर बैलगाड्या सोडण्यात आल्या. दगडफेक झाली. त्यात काही पोलीस जखमी झाले. पोलिसांनी ही स्थिती योग्य पद्धतीने हाताळली. भूसंपादनासाठी सर्वेक्षणाच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे.

जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

कुंभारवळण येथे झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. शासनाने नागरिकांच्या भावना समजून घेऊन योग्य ती पावले उचलणे आवश्यक होते. मात्र, बळाचा वापर करण्यात आला, ही बाब निश्चितच दुःखद आहे.

सुप्रिया सुळे, खासदार