पुणे : देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर जातनिहाय सर्वेक्षण केले जाणार आहे. जातनिहाय जनगणना हे क्रांतिकारक पाऊल आहे. त्यानंतर जनता जागरूक होईल आणि राजकारण बदलेल. तसेच आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवली जाईल. त्यामुळे मराठा, धनगर आणि अन्य लहान जातींना आरक्षण मिळेल, अशी भूमिका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुण्यात मांडली.पुणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी एसएसपीएमएसच्या मैदानावर आयोजित सभेत गांधी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यघटना वाचवण्याची लढाई असल्याचे सांगून गांधी म्हणाले, की काँग्रेस, इंडिया आघाडी घटना वाचवत आहे. मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राज्यघटना संपवत आहे. राज्यघटना संपवल्यास मागासवर्गीय, अल्पसंख्याकांना मिळणारे अधिकार हिरावले जातील. राज्यघटना नष्ट केल्यास देशाची ओळख राहणार नाही. मात्र, डॉ़. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांनी जे देशाला दिले, ते संपवू देणार नाही, असे राहुल म्हणाले. शेतकऱ्यांना कर्जमाफी, हमीभाव मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कर्जमाफी आयोगाची निर्मिती केली जाणार असल्याचे ते म्हणाले. 

हेही वाचा >>> शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्.., भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO

मोदी यांनी राजकारणाची चेष्टा चालवली आहे..

कर्नाटकमध्ये ४०० महिलांवर बलात्कार करणाऱ्या रवण्णाचा प्रचार पंतप्रधानांनी केला. मोदी यांनी राजकारणाची चेष्टा चालवली आहे. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांवर काहीबाही बोलून अपमान करतात. मात्र, देशावर बोलत नाही, अशी टीका गांधी यांनी केली.

रोखे घेणाऱ्यांची नावे का दडवली?

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे बेकायदा ठरवले. मोदी यांना राजकारण स्वच्छ करायचे होते, तर रोखे घेणाऱ्यांची नावे का दडवली? देशासमोर मोदी भ्रष्टाचार करत आहेत. देशात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर नसताना लस तयार करणारी कंपनी मोदींना पैसे देत होती, अशी टीकाही त्यांनी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi promises reservation for maratha and dhangar community zws