लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. प्रचार सभांना वेग आलेला असताना प्रचाराच्या नियोजनासाठी जोरात बैठकाही होत आहेत. यादरम्यान, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा एक व्हीडिओ भाजपाकडून व्हायरल केला जातोय.
शुक्रवारी ३ मे रोजी मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या एक्सवर भाजपाच्या अनेक नेत्यांकडून हा व्हीडिओ व्हायरल केला जातोय. या व्हीडिओमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काही पदाधिकारी दिसत आहेत. शरद पवार एका बैठकीत असून उद्धव ठाकरे उभे आहेत. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जाण्याची सूचना केली. तर, त्यांच्या सूचनेचं पालन करत मी बाजूला आहे, जरा फ्रेश होऊन येतो, असं ठाकरे म्हणत आहेत.
एकीकडे राज्यात उष्णतेचा पारा वाढत असताना दुसरीकडे राज्यात राजकीय वातावरणही तापलं आहे. आरोप-प्रत्यारोपांना उत आला असून अनेक केंद्रीय नेते महाराष्ट्रात येऊन त्यांच्या उमेदवारांसाठी प्रचार करत आहेत. दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हीडिओबाबत अद्यापही शरद पवार गट किंवा उद्धव ठाकरे गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यांच्या प्रतिक्रियेनंतरच या व्हीडिओमागची सत्यता कळू शकेल.
हेही वाचा >> नरेंद्र मोदी यांच्या इतकी पंतप्रधान पदाची अप्रतिष्ठा कधीही झाली नाही – शरद पवार
अमित शाह आणि नरेंद्र मोदींकडून शरद पवार लक्ष्य
दरम्यान, नरेंद्र मोदी आणि अमित शाह गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र दौऱ्यावर होते. महाराष्ट्र दौऱ्यावर असताना या दोन्ही केंद्रीय नेत्यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं. शरद पवारांनी त्यांच्या काळात राज्यात काय विकास घडवला, असा प्रश्न दोघांनीही उपस्थित केला. यावरून शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. देश विकासासाठी सर्वच पंतप्रधानांनी काम केले आहे, मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात आल्यावर माझ्यावर आणि उद्धव ठाकरेंवर टीका केल्याविना स्वस्थता वाटत नसावी अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांनी गुरुवारी तासगावमध्ये झालेल्या सभेत केली.
पवार म्हणाले, इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या, राज्यांमधल्या अनेक भागात त्या जात असत. देशातल्या गरीब लोकांची गरिबी कशी घालवायची हा विचार मांडत असत. देशातल्या सगळ्याच पंतप्रधानांनी हे काम केलं आहे. आत्ताचे पंतप्रधान (नरेंद्र मोदी) महाराष्ट्रात येतात. महाराष्ट्रात आले की त्यांना दोन लोकांची आठवण होते. एक उद्धव ठाकरे दुसरे शरद पवार. आम्हा दोघांवर टीका केल्याशिवाय त्यांना स्वस्थ बसवत नाही. पैलवान पाटील यांनी कुस्ती क्षेत्रात डबल महाराष्ट्र केसरी किताब दोन वेळा पटकावून नाव कमावले आहे. कुस्तीप्रमाणेच संसदेतही ते चांगले काम करतील.