पुणे : माथाडी कायद्यातील बदलाच्या निषेधार्थ ज्येष्ठ कामगार नेते डाॅ. बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारपासून महराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाकडून ‘सत्याग्रह आंदोलन’ सुरू करण्यात आले. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आठवडाभर हे आंदोलन सुरू राहणार असून, पाच जिल्ह्यांतील कामगार संघटनेचे प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

माथाडी कायद्यातील बदलांमुळे कृषी उत्पन्न बाजारातील तोलणार, मापाडी, तसेच औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना माथाडी कायद्याचे संरक्षण मिळणार नाहीत. हे बदल त्वरित मागे घेण्यात यावेत, माथाडी मंडळाच्या कामकाजात सुधारणा व्हावी, या मागणीसाठी मंगळवारपासून विभागीय कार्यालयावर सात दिवस धरणे धरण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने राज्यभरातील विभागीय आयुक्त कार्यालयावर धरणे धरण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य हमाल मावाडी महामंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ कामगार नेते डाॅ. बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारपासून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे, समन्वयक संतोष नांगरे, हनुमंत बहिरट, विकास मगदूम, संजय साष्टे, चंद्रकांत मानकर, विशाल केकाने, शशिकांत नांगरे, संतोष ताकवले, किशोर भानूसघरे, नागपूरचे विलास भोंगाडे, हुसेनजी पठाण, कागद काच पत्रा संघटनेच्या शैलजा आरळकर यावेळी उपस्थित होते.

या आंदोलनात सांगली, रत्नागिरी, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर येथील कामगार संघटनेचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज कामगार युनियन, हमाल पंचायत, तोलणार संघटना, महात्मा फुले कामगार संघटना, कागद काच पत्रा, रिक्षा पंचायत, लोणावळा हमाल पंचायत, कामगार युनियन मांजरी मार्केट अशा संघटना सहभागी झाल्या आहेत, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी महाराज कामगार युनियनचे सरचिटणीस संतोष नांगरे यांनी दिली.

या आंदोलनाची दखल राज्य शासनाने घेतली नाही, तर श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड बेमुदत बंद ठेवण्यात येईल, असा इशारा नांगरे यांनी यावेळी दिला.