लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी : शहरातील जेष्ठ नेते, माजी महापौर आझमभाई पानसरे यांनी शरद पवार यांना समर्थन दिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ वाढणार आहे. शहरातील मुस्लिम समाज पानसरे यांच्या पाठिशी आहे. पानसरे यांनी पवार यांना समर्थन दिल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जाते.

पानसरे यांनी रविवारी पुण्यात शरद पवार यांची भेट घेत आपले समर्थन दिले. शहरातील राजकारणाविषयी सविस्तर चर्चा केली. पिंपरी-चिंचवड शहराला शरद पवार यांच्याशी पर्याय नसल्याचे पानसरे यांनी म्हटले आहे. शहराध्यक्ष तुषार कामठे यावेळी उपस्थित होते.

आणखी वाचा-उपचारासाठी रुग्णालयात, मुक्काम तारांकित हाॅटेलात… जाणून घ्या अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलचे कारनामे

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दोन्ही गटाने पिंपरी-चिंचवडवर लक्ष केंद्रित केले आहे. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, दोन नगरसेवक वगळता सर्व माजी नगरसेवक, शहर कार्यकारीणीने अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसही सरसावली आहे. शहराची जबाबदारी आमदार रोहित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. रोहित यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे शहरातील दौरे वाढले आहेत. सोमवारी पुन्हा पाटील शहरात येणार आहेत.

आणखी वाचा-पिंपरी- चिंचवड: अजित पवार गटाला शह देण्यासाठी शरद पवार गटाचा सायकल दौरा!

पक्षातील फुटीनंतर पानसरे यांची भूमिका समोर आली नव्हती. आता त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना समर्थन दिले आहे. आझम पानसरे हे शहरातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी शहराचे महापौरपद भूषविले आहे. लोकसभा निवडणुकीचाही अनुभव आहे. पिंपरी मतदारसंघात त्यांची मोठी ताकद आहे. पानसरे ज्यांना साथ देतात, तो पिंपरीचा आमदार होतो हे मागील तीन निवडणुकीत दिसून आले. त्यामुळे अजित पवार गटात गेलेले आमदार अण्णा बनसोडे यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior leader azambhai pansare supports sharad pawar instead of ajit pawar pune print news ggy 03 mrj