पिंपरी : केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे. विरोधात बोलणाऱ्यांना खोट्या केस टाकून तुरुंगात टाकले जाते. देश हुकूमशाहीच्या रस्त्याने चालला आहे. या देशात ज्यांच्या साम्राज्यात सूर्य मावळत नाही असे म्हणणाऱ्या इंग्रजांना महात्मा गांधी घालवू शकले. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी काय चीज आहेत, असा सवाल करत त्यांनाही सत्तेतून घालवू, असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिरुरचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सांगता सभा हडपसर येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. माजी आमदार महादेव बाबर, बाळासाहेब शिवरकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे, निलेश मगर यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा – …अन पाकिस्तानला माहीत आहे, त्यांचा बाप दिल्लीत बसलाय – देवेंद्र फडणवीस

भाजपला टीका, वेगळे मत सहन होत नाही. मनाविरोधात बोलले की खोट्या केस टाकून तुरुंगात टाकत असल्याचा आरोप करत पवार म्हणाले की, दहा वर्षांत काय केले हे सांगण्यापेक्षा मोदी व्यक्तीगत हल्ले करत आहेत. असत्यावर आधारित बोलत आहेत. काँग्रेसच्या जाहिरनाम्यात उल्लेख नाही, अशा गोष्टी मांडतात. भगिनींच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेतील असे सांगतात. सांगण्यासारखे काही नसल्याने असत्य प्रचार करत आहेत. राहुल गांधी यांची टिंगलटवाळी करतात. गांधी कुटुंबाने देशासाठी योगदान दिले असून त्याच्या एक टक्का तरी मोदी यांनी योगदान दिले का, याचे उत्तर द्यावे. देशात गांधी-नेहरु यांचा विचार मजबूत केला पाहिजे असे विधान मी केले. त्यावर आमच्या पक्षात या म्हणत आहेत. ज्या पक्षात व्यक्तीगत स्वातंत्र्य नाही, देशाच्या ऐक्याच्या विचार नाही. विचारधारेत समाजातील सर्व घटकांना आत्मविश्वास देण्याचा कार्यक्रम नाही. धर्मवादी विचाराचा पुरस्कार केला जातो, अशा पक्षाच्या आसपाससुद्धा मी, उद्धव ठाकरे आयुष्यात कधी उभे राहणार नाही. या लोकांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी जे काही करता येईल, ते केले जाईल.

देशातील निवडणुका एक, दोन ते जास्तीत-जास्त तीन दिवसात झाल्या. यंदा पहिल्यांदा सात टप्प्यांत निवडणूक होत असून निवडणूक विभागाचा निर्णय संशय निर्माण करणारा आहे. ४० खासदार असलेल्या तामिळनाडूतील निवडणूक एका टप्प्यात आणि महाराष्ट्रातील ४८ खासदारांची निवडणूक सहा टप्प्यांत, हे कशासाठी, याचा अर्थ काय, लोकांच्या मनात निवडणूक प्रक्रियेबाबत शंका आहे. त्याला पुष्टी देण्याचे काम या निर्णयामुळे होत असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा – ‘ऑनलाइन’ सरकारी खोळंबा अन् केंद्रीय मंत्रालयाकडे बोट!

जनतेचा प्रतिसाद मिळत नसल्याने महाराष्ट्रात सभा

देशाच्या पंतप्रधानांनी एका राज्यात किती वेळा प्रचारासाठी जावे. पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी यांची राज्यात एक सभा होत होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी एका राज्यात आठ सभा घेतात. तो त्यांचा अधिकार आहे. पण, आजपर्यंत हे कधी घडले नाही. आताच का घडत आहे. एवढ्या सभा घेऊनसुद्धा हवा तो परिणाम दिसत नाही. त्यामुळे ते सातत्याने सभा घेतात. शासनाचा जमाव घेऊन जात त्या माध्यमातून निवडणुकीचे निकाल वेगळे लागतील का याची खबरदारी घेणे हे सूत्र मोदी यांचे आहे, असे दिसते. त्याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल, असेही पवार म्हणाले.

सत्तेच्या मलिद्यासाठी चेतन तुपे यांचा वेगळा निर्णय

देशाच्या, राज्याच्या ऐक्यासाठी दिवंगत विठ्ठलराव तुपे हे नेहमी संघर्ष करायची तयारी करणारे होते. ते नेहमी जनसंघ, भाजपच्या विचारापासून दूर राहिले. त्यांची परंपरा दुसऱ्या पिढीने चालवावी, अशी अपेक्षा होती. दुर्दैवाने त्यांची आताची पिढी आमदार चेतन तुपे हे आमच्या पाठिंब्याने विजयी झाले. परंतु, सत्तेचा मलिदा मिळेल या हेतूने भाजपसोबत गेले. याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, असा इशाराही पवार यांनी दिला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar comment on modi in amol kolhe prachar sabha hadapsar pune print news ggy 03 ssb