पुणे : महाराष्ट्रात निवडणुकीच्या आधी राज्य सरकारने ‘लाडकी बहीण योजने’द्वारे पैसे वाटप केले. त्याचप्रमाणे बिहारमध्ये महिलांच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये जमा करण्यात आल्याचा परिणाम बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर झाल्याची टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशाचे वाटप केल्यास निवडणूक पद्धतीबद्दल मतदारांच्या विश्वासाला धक्का बसेल. हे योग्य आहे का, याचा विचार आता निवडणूक आयोगाने करावा, अशी सूचनाही पवार यांनी केली.
बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधताना पवार म्हणाले, ‘यापुढील काळात सत्ता हातात असलेल्यांनी मतदानाच्या आधी पैशाचे वाटप करून निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका घेतल्यास लोकांच्या विश्वासाला धक्का बसेल. याची चिंता वाटत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप करणे योग्य आहे का, याचा विचार जाणकारांनी आणि निवडणूक आयोगाने केला पाहिजे.’
‘निवडणुका या स्वच्छ, पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत याबाबत कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. महाराष्ट्रात निवडणुकीच्या आधी सरकारने ‘लाडकी बहीण योजने’द्वारे पैसे वाटप केले. त्याचप्रमाणे बिहारमध्ये महिलांच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये जमा करण्यात आल्याचा परिणाम बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर झाला,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.
‘सर्व राज्यांमध्ये सुमारे ५० टक्के महिला मतदार आहेत. त्यांना दहा हजार रुपये देऊन निवडणुकीला सामोरे जाणे याचा अर्थ निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ वातावरणात होतात का, याबाबत लोकांच्या मनात शंका आहे. निवडणूक आयोगाने याचा विचार केला पाहिजे,’ असेही पवार म्हणाले.
‘आयोगाची बघ्याची भूमिका’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आयोगाचे आभार मानले. याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, ‘पैसे वाटप होत असताना आयोगाने बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे हे होणारच.’
‘स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा’
‘स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पक्ष म्हणून लढविण्यात येत नाही. स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसने निर्णय घेतल्यास आश्चर्य वाटणार नाही
मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यावर पवार म्हणाले, ‘अद्याप निवडणूक जाहीर झालेली नाही. मुंबईत काँग्रेस स्वतंत्र लढणार की नाही, हे मला माहीत नाही. मात्र, त्यांनी तसा निर्णय घेतला, तर आश्चर्य वाटणार नाही.’
