पुणे : ‘‘मी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याला विरोध करायचा असे कुणाला सांगायचे कारण काय? माझ्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे,’’ असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आरोप शनिवारी फेटाळले. ‘राष्ट्रवादी’च्या नावावर मते मागितल्यावर आता भाजपबरोबर जाण्याची अजित पवार यांची भूमिका विसंगत आहे, अशी टीका पवार यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार-खासदारांची शनिवारी पुण्यात बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत पवार यांनी अजित पवार यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करून पक्षाची साथ सोडलेल्या नेत्यांना लक्ष्य केले.

‘‘मी राजीनामा दिल्यानंतर त्याला विरोध करायचा असे कुणाला सांगायचे कारण काय? मी राजीनामा दिल्यानंतर तो मागे घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड किंवा आनंद परांजपे यांच्या परवानगीची गरज नाही. माझ्यात स्वत:चा निर्णय घेण्याची कुवत आहे. कोण काय बोलले, यापेक्षा सत्य काय आहे, ते महत्त्वाचे आहे’’, असे पवार म्हणाले. ‘‘अजित पवारांनी आता एक राजकीय निर्णय घेतला आहे. तो त्यांचा अधिकार आहे. पण, माझी फक्त एकच तक्रार आहे, की त्यांनी ज्या वेळी निवडणुकीचा अर्ज भरला, तेव्हा  ‘राष्ट्रवादी’च्या नावाचा अर्ज होता. त्यांना माझ्या किंवा जयंत पाटील यांच्या स्वाक्षरीने तिकीट देण्यात आले. त्यांनी लोकांमध्ये जाऊन राष्ट्रवादीच्या नावावर मते मागितली. मग आता पक्षाशी विसंगत भूमिका घेणे योग्य नाही,’’ असे शरद पवार म्हणाले.

हेही वाचा >>>प्रफुल पटेलांच्या घराचे किती मजले ईडीने का ताब्यात घेतले यावर…”; शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले…

‘‘पक्ष सोडून गेलेले ज्या रस्त्याने जाण्याचा विचार करत होते, तो आम्हाला मान्य नव्हता. विधानसभा निवडणुकीत आम्ही जी मते मागितली होती, ती भाजपबरोबर जाण्यासाठी नव्हती. तेव्हा आम्ही जी भूमिका मांडली, त्या विरोधात जाणे ही लोकांची फसवणूक ठरली असती,’’ असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

‘पटेलांच्या पुस्तकाची वाट पाहतोय!’

शरद पवार यांनी प्रफुल पटेल यांनाही लक्ष्य केले. ‘‘२००४ मध्ये लोकसभा निवडणुकीआधी पटेल माझ्या घरी आले होते. आपण भाजप, वाजपेयींबरोबर गेले पाहिजे, असे अनेक वेळा तासन् तास सांगत होते. हे स्वीकारणे शक्य नाही, हे मी त्यांना स्पष्ट सांगितले. तुम्हाला जायचे असल्यास जाऊ शकता. तुम्ही हा निर्णय घेतल्यास माझा काही गैरसमज होणार नाही, असा सल्ला मी त्यांना दिला होता. भाजपबरोबर जाण्यास पटेलच अतिशय आग्रही होते. माझ्या नकारानंतर ते थांबले. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतरही त्यांना पक्षाने केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी दिली होती. मी त्यांच्या पुस्तकाची वाट पाहतोय. लोक पक्ष सोडून का जातात, त्यांच्या मुंबईतील घराचे किती मजले ‘ईडी’ने का आणि कशासाठी ताब्यात घेतले, याबाबत त्यांनी पुस्तकात लिहावे म्हणजे आमच्या ज्ञानात भर पडेल, असा टोला पवारांनी लगावला.

‘मुश्रीफ माझ्याकडे पाच तास बसून’

भाजपने मला खोटय़ा प्रकरणात फसवले. त्यामुळे त्या पक्षाबरोबर जाण्याचा प्रश्नच नव्हता. अजित पवारांनी बंड केल्यानंतर हसन मुश्रीफ माझ्याकडे येऊन पाच तास बसले होते. तुम्हाला हवे ते खाते मिळेल, पण तुम्ही आमच्याबरोबर या, असे त्यांनी सांगितले. पण मी पवार साहेबांबरोबर राहणार, असे मुश्रीफांना मी स्पष्ट सांगितले, असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या वेळी स्पष्ट केले.

‘सोडून गेलेले लोक पुन्हा निवडून येत नाहीत’

‘‘माझ्या पक्षातून सोडून गेलेले लोक पुन्हा निवडून येत नाहीत. १९६९ मध्ये मी १५ दिवसांसाठी परदेशात होतो. परत आलो तेव्हा माझ्याकडे सहा आमदार शिल्लक होते. त्यानंतर जी निवडणूक झाली, त्यात सोडून गेलेले पुन्हा विधानसभेत दिसले नाहीत. मी आतापर्यंत काय घडले त्याचा इतिहास सांगतोय,’’ अशा शब्दांत पवारांनी सोडून गेलेल्यांना इशारा दिला.

बारामतीच्या उमेदवाराबाबत निर्णय प्रदेशाध्यक्षांचा  महायुतीत चर्चेपूर्वीच अजित पवार यांनी बारामतीसह शिरूर, रायगड आणि साताऱ्यातील जागांवर दावा केला आहे. त्यामुळे बारामतीतील उमेदवाराबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. याबाबत शरद पवार म्हणाले, ‘‘लोकशाहीत कोणी कुठूनही निवडणूक लढवू शकतो. बारामतीचा उमेदवार कोण असेल, हे प्रदेशाध्यक्ष ठरवतील. पक्ष सोडून गेलेल्यांची काळजी करण्याची गरज नाही. आगामी निवडणुकीत युवा नेत्यांना बळ दिले जाईल.’’

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar reply that ajit pawar role is inconsistent amy