राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर गंभीर आरोप केले. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. अखेर शरद पवारांनी शनिवारी (२ डिसेंबर) पुण्यात पत्रकार परिषद घेत या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. यावेळी पवारांनी प्रफुल पटेल यांच्या पुस्तक लिहिण्याच्या इशाऱ्याचाही चांगलाच समाचार घेतला.
शरद पवार म्हणाले, “चांगली गोष्ट आहे. प्रफुल पटेल पुस्तक यांचं पुस्तक कधी येतंय याची मी वाट पाहतोय. त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. त्यांनी त्यावर पुस्तक लिहावं. त्यात त्यांनी एक प्रकरण अलिकडे लोक पक्ष सोडून का जातात यावर लिहावं. त्यांच्या घरात ईडीचे अधिकारी आले होते असं ऐकलंय. त्यावरही पुस्तकात एक प्रकरण लिहावं.”
हेही वाचा : “२००४ मध्ये भाजपाबरोबर जाणार होते, पण…”; शरद पवारांवरील प्रफुल्ल पटेलांच्या आरोपावर जयंत पाटील म्हणाले…
“प्रफुल पटेलांच्या घराचे किती मजले ईडीने का ताब्यात घेतले?”
“मुंबईत प्रफुल पटेल यांचं घर आहे. त्या घराचे किती मजले ईडीने ताब्यात घेतले आणि हे मजले का ताब्यात घेतले यावरही एक प्रकरण पुस्तकात लिहावं. त्यामुळे आमच्या सर्वांच्या ज्ञानात भर पडेल,” असं म्हणत शरद पवारांनी प्रफुल पटेलांना टोला लगावला.