लोकसत्ता वार्ताहर
नारायणगाव: आंबेगाव तालुक्याचे आमदार, माजी गृहमंत्री आणि शरद पवार यांचे विश्वासू सहकारी दिलीप वळसे पाटील यांच्यासह शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे भाजप-शिवसेना (शिंदे गट) सरकारच्या सत्तेत सहभागी झाल्याने शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणिते बदलणार असून राज्यातील राजकीय भूकंपासह शिरूर मतदारसंघातही मोठे भूकंप होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सोडून दिलीप वळसे पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत जातील असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र, राजकीय भूकंपामध्ये दिलीप वळसे पाटील यांनी सर्वांना धक्का देत अजित पवार यांना साथ दिली. शरद पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी डॉ. अमोल कोल्हे यांना जाहीर केली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी झाल्याने शिरूर लोकसभा लोकसभेची जागा अजित पवार यांच्या गटाकडे जाणार हे निश्चित झाल्याने शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांची पंचाईत झाली आहे.
आणख वाचा-“मी काही ज्योतिषी नाही…”, शरद पवार यांची मिश्किल टिप्पणी
अजित पवार यांच्या भूकंपाची कल्पना नसताना शिरूर लोकसभेची जागा शिवसेनेकडे (शिंदे गट) जाणार होती. विद्यमान खासदार असल्याने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार हे निश्चित झाल्यामुळे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यांच्या सोबत जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे हे देखील शिंदे गटात सहभागी झाले होते.
शिरूरमधील पाच आमदार अजितदादांसमवेत
आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यासह जुन्नरचे आमदार अतुल बेनके, शिरूरचे आमदार अशोक पवार, खेडचे आमदार दिलीप मोहिते आणि पुण्यातील हडपसरचे आमदार चेतन तुपे हे अजित पवार यांच्यासमवेत गेल्याने शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांना मोठा धक्का मानला जातो. आता बदललेल्या राजकीय घडामोडीमुळे शिरूर लोकसभा मतदार संघातही राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, दिलीप वळसे पाटील हे भाजप-शिवसेना सत्तेत सहभागी झाल्याने आंबेगाव तालुक्यात दिलीप वळसे पाटील समर्थकांनी मोठा जल्लोष केला आहे. तर, जुन्नरची उमेदवारी मिळेल या अपेक्षेने माजी आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. मात्र, आता विद्यमान आमदार अतुल बेनके सत्तेमध्ये सहभागी झाल्याने सोनवणे यांची गोची झाली आहे.