पुणे : सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू गावात तलाठी, तहसीलदार यांना गावगुंडानी केलेल्या मारहाणीचा प्रकार राज्यासाठी अत्यंत निंदणीय असून या गावगुंडांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांना मंत्र्यांकडून दमदाटी केली जाते, या सारखी लाजीरवाणी गोष्ट नाही. महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही, अन्यथा रस्त्यावर उतरून जनआंदोलन केले जाईल, अशा शब्दात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला इशारा दिला.
या प्रकरणात दररोज आरोप- प्रत्यारोप होत असून एका सक्षम महिला पोलीस अधिकाऱ्याची बदनामी केली जात आहे. गावगुंड मोकाट फिरत असून त्यांना तत्काळ अटक करावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लक्ष घालून सविस्तर खुलासा करावा, अशी मागणीही सुळे यांनी यावेळी केली. जनसुरक्षा कायद्यासंदर्भात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षातर्फे बुधवारी (१० सप्टेंबर) राज्यभर जनआंदोलन करण्यात येत आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सुळे यांच्या उपस्थित जनआंदोलन करण्यात आले. यावेळी सुळे यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या परिस्थितीवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले.
सुळे म्हणाल्या , ” सोलापूर, माढा तालुक्यातील कुर्डू गावात अवैध गौण खनिज उत्खनन सुरू असताना कारवाईसाठी गेलेल्या तलाठी, तहसीलदार यांना गावगुंडांकडून मारहाण केली जात असेल, तर ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा गेल्यावर कारवाई थांबविण्यासाठी मंत्र्यांकडून सांगितले जाते. महिला पोलीस अधिकाऱ्याच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते, ही राज्याला दुसऱ्या दिशेकडे घेऊन चाललेली संस्कृती आहे.”
हे प्रकरण एवढ्यावर न थांबता दररोज नवनवीन माहिती ऐकावयास येत असून थेट आयपीएस अधिकारी असलेल्या कृष्णा यांच्या निवडीवरून प्रश्न उपस्थित केले आहे. परंतु, कृष्णा या त्यांच्या बुद्धिमत्तेवर भारतीय प्रशासकीय सेवेतील परीक्षा देऊन उत्तीर्ण झाल्या आहेत. त्या चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी कारवाई केली म्हणून थेट कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करणे हे अत्यंत चुकीचे असून, ज्या गावगुंडांनी तलाठी, तहसीलदार यांना मारहाण केली त्यांच्याविरूद्ध तातडीने कारवाई करावी, अशी मागणी सुळे यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात गांभार्याने लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश द्यावे, असेही सुळे यांनी सांगितले.