पुणे : शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील मतदार नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार १० डिसेंबर पर्यंत नाव नोंदविणाऱ्या अर्जांवर निर्णय घेऊन पात्र मतदारांचा समावेश ३० डिसेंबर रोजीच्या अंतिम मतदार यादीमध्ये करण्यात येणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पुणे, नागपूर आणि औरंगाबाद विभाग पदवीधर तसेच पुणे आणि अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघातून पुढील वर्षी अपेक्षित असलेल्या द्विवार्षिक निवडणुकांसाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार नाव नोंदणीसाठी सहा नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती. सहा नोव्हेंबर पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांबाबत पात्र-अपात्रतेचा निर्णय घेऊन त्या आधारे प्रारूप मतदार यादी २५ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मात्र सहा नोव्हेंबर पर्यंतच्या अर्जांच्या आधारे प्रारूप मतदार याद्या करण्यात येणार असल्या तरी पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी १० डिसेंबर पर्यंत नावे नोंदविता येणार आहेत. या अर्जांवरील पात्र-अपात्र मतदारांबाबतचा निर्णय घेऊन ३० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
दरम्यान, पात्र पदवीधर आणि शिक्षकांकडून अनुक्रमे प्रपत्र १८ आणि १९ भरून नाव नोंदणी करावी लागणार आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत या यादीच्या अनुषंगाने दावे आणि हरकती सादर करता येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. पदवीधर आणि शिक्षक मतदार नोंदणी ऑनलाइन पद्धतीनेही करता येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या https://mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जे पात्र पदवीधर किंवा शिक्षक मतदारांनी अद्यापही नाव नोंदणी केलेली नाही. त्यांनी ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणीसाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी आवश्यक पात्रत, सोबत जोडावयाची कागदपत्रांची माहिती ऑनलाइन नाव नोंदणीसाठीच्या संकेतस्थळावरील Manual या शीर्षकामध्ये देण्यात आली आहे.
