पुणे : राज्यात उन्हाचा पारा मार्चअखेरीस वाढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर एप्रिल महिन्यात आतापर्यंत उष्णतेच्या लाटांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. पुढील पाच दिवस उत्तर भारत, पूर्व किनारपट्टी आणि दक्षिण भारतात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकण किनारपट्टीवरही पाच दिवस आर्द्रतायुक्त उष्ण तापमान राहण्याचा अंदाज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात २२ मार्चपासून पारा ४० अंशांवर आहे. एप्रिलच्या मध्यात प्रामुख्याने विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पारा ४२ आणि ४३ अंशांवर गेला होता. दि. १९ एप्रिल रोजी अकोल्यात ४४ अंश कमाल तापमानाची नोंद झाली होती. मागील चार-पाच दिवस तापमान काहीसे कमी झाले होते. आता पुन्हा तापमानात वाढ होण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रामुख्याने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशातील तापमानवाढीचा परिणाम विदर्भ आणि मराठवाड्यात दिसून येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – ‘डॉ. कोल्हे जरा विकासाचेही बोला…’, शिवाजीराव आढळराव-पाटील यांचा टोला

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस प्रामुख्याने गंगा नदीचे खोरे, पश्चिम बंगाल, ओडिशा, पूर्व किनारपट्टी आणि दक्षिण भारतात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणात गंभीर उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आर्द्रतायुक्त उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात पुन्हा वाढ होण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी थंड वाऱ्यामुळे मार्चअखेरीस उत्तर भारतात तापमान सरासरी इतके राहिले. थंड वाऱ्याचा प्रभाव कमी होताच एप्रिलच्या सुरुवातीपासून राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गंगा नदीच्या खोऱ्यात कमाल तापमान ३८ ते ४१ अंश सेल्सिअस दरम्यान राहिले. मागील आठवडाभर गंगा नदीचे खोरे तापत आहे. अनेक ठिकाणांना उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागला. एप्रिलच्या उर्वरित पाच-सहा दिवसांतही उष्णतेच्या लाटा येण्याचा अंदाज आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.

अवकाळी, गारपिटीचीही शक्यता

पुढील पाच दिवस राज्याच्या बहुतेक भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हेही वाचा – पुणे : ससूनमध्ये राजकारण जोमात, रुग्णसेवा कोमात! उपचार अन् औषधाविना रुग्णांचे हाल

राज्यात पारा चाळीसवर

अंशतः ढगाळ हवामान, हवेत वाढलेली आर्द्रता आणि अधूनमधून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे राज्यात कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी घट झाली आहे. बुधवारी मालेगावात सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सोलापूरमध्ये ४१.२, बीड, ४०.१, अकोला ४०.४, अमरावती ४०, वाशिम ४०.६, तर वर्ध्यात ४०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात अन्य ठिकाणी पारा ४० अंशांच्या खाली राहिला. मध्य महाराष्ट्रात सरासरी ३८, किनारपट्टीवर ३२, तर मराठवाडा आणि विदर्भात पारा सरासरी ३९ अंशांवर राहिला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This year april is the month of heat waves know the weather of maharashtra and india pune print news dbj 20 ssb
First published on: 25-04-2024 at 10:36 IST