पुणे : पीएमपीच्या पर्यटन बससेवेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने या सेवेचा विस्तार करण्यात आला असून स्वारगेट, एकविरा देवी मंदिर, कार्ला लेणी आणि लोणावळा अशी सेवा सुरू करण्यात आली आहे. बसच्या आसन क्षमतेनुसार पूर्ण ३३ प्रवाशांचे ग्रुप तिकिट काढल्यास पाच प्रवाशांच्या तिकिटाची रक्कम माफ करण्यात येणार आहे.

पीएमपीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते उपस्थितीमध्ये या नव्या मार्गावर तीन गाड्या मार्गस्थ करण्यात आल्या. या पर्यटने बससेवेसाठी एकूण ९९ प्रवाशांनी तिकिट बुकिंग केले होते. त्यामध्येही महिला पर्यटकांची संख्या लक्षणीय असल्याची माहिती पीएमपीच्या वाहतूक व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरानजीकच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांसाठी एकूण अकरा पर्यटन बसमार्ग पीएमपी प्रशानसाने निश्चित केले आहेत. त्यामध्ये पर्यावरणपूरक आणि वातानुकुलीत ई-बसद्वारे विशेष पर्यटन बससेवा सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पर्यटन सेवा उपलब्ध होती. मात्र आता आवश्यक तेवढे बुकिंग झाल्यास आठवड्याचे सातही दिवस पर्यटन बससेवा उपलब्ध असणार आहे. या पर्यटन बससेवेसाठी प्रती प्रवासी तिकिट दर पाचशे रुपये असा निश्चित करण्यात आला आहे.

स्वारगेट, डेक्कन जिमखाना, एकवीरा देवी मंदीर, कार्ला लेणी, लोणावळा असा या सेवेचा मार्ग असेल. लोणावळा रेल्वे स्थानक परिसरात बस पार्किंग झाल्यानंतर प्रवाशांना स्वखर्चाने अन्य खासगी वाहनांनी भूशी धरण, मनशक्ती ध्यान केंद्र, वॅक्स म्युझियम आणि अन्य प्रेक्षणीय स्थळांना भेट देता येणार आहे. त्यानंतर ही गाडी पुन्हा स्वारगेट येथे येणार आहे.

या सेवेसाठी डेक्कन जिमखाना, पुणे स्थानक, स्वारगेट, कात्रज, हडपसर-गाडीतळ, पुणे महापालिका भवन, निगडी आणि भोसरी बसस्थानक या पास केंद्रावर आरक्षण करता येणार आहे. या पर्यटनसेवेसाठी ज्या दिवशी पर्यटकांचा अल्प प्रतिसाद मिळेल किंवा काही अपरिहार्य कारणास्तव ही सेवा रद्द झाल्यास बुकिंग केलेल्या पर्यटकांना अन्य दिवशी पीएमपीच्या अन्य मार्गांवर प्रवास करण्याची सुविधा मिळणार आहे.

दरम्यान, पर्यटन सेवेचे ज्या दिवशी आरक्षण केले आहे त्या दिवशी संबंधित पर्यटकांना राहत्या घरापासून बस सुटण्याच्या ठिकाणापर्यंत आणि सायंकाळी पोहोचल्यानंतर त्यांच्या राहत्या घरापर्यंत पर्यटन सेवेच्या तिकिटावर अन्य मार्गाच्या गाड्यांमधून प्रवास करता येणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.