Pune Heavy Vehicle Accident Deaths: पुणे शहर, उपनगरातून जाणाऱ्या अहिल्यानगर, सातारा आणि सोलापूर महामार्गांवर अवजड वाहनांची वाहतूक जीवघेणी ठरत आहे. गेल्या पाच वर्षांत अवजड वाहनांचे १२०० हून अधिक अपघात झाले आहेत. त्यांमध्ये एक हजार ४७५ जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यात सुमारे ५०० पादचारी आहेत. या वर्षी जानेवारीपासून ऑगस्टअखेर १९५ अपघात आणि १९९ मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उपनगरांमधील रस्ते आणि त्यांच्या हद्दीवरून जाणारे जिल्हा, राज्यमार्गांवर अवजड वाहनांसाठी कालावधी निश्चित करून दिला आहे. त्यानुसार शहरांमध्ये डंपर, मालमोटर (ट्रक) आणि इतर अवजड वाहनांना सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत ठिकठिकाणी निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, शहरांच्या हद्दीतून जाणाऱ्या महामार्गांवरून अवजड वाहनांची वाहतूक सुरूच असते.
तसेच मध्यवर्ती ठिकणी सुरू असलेल्या विकासकामांमुळे या वाहनांची वर्दळ कायम आहे. प्रमाणापेक्षा अधिक माल भरून वाहतूक, वेगात, तसेच मद्याच्या नशेत वाहन चालविणे अशा अनेक प्रकारांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, हे अपघात जीवघेणे ठरत असल्याने दुचाकी किंवा मोटारचालकांना रात्रीच्या वेळी महामार्गावरून वाहन चालविणे जिकिरीचे ठरत असून, प्रवाशांकडून भीती व्यक्त केली जात आहे.
पुणे शहरातून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या येरवडा, खराडी, वाघोली, शिक्रापूर, रांजणगाव, तसेच सोलापूरकडे जाताना हडपसर, उरुळीकांचन, तर सातारा महामार्गावरील कात्रज, नवले पूल, खेड-शिवापूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रहदारी असून, अपघाताच्या घटना वारंवार घडत असल्याने तातडीने अवजड वाहनांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
अवजड वाहनांमध्ये प्रमाणापेक्षा जादा मालवाहतूक होत असून, रात्रीच्या वेळेला भरधाव वाहने चालवली जात आहेत. तसेच मद्यधुंद अवस्थेत वाहतूक होत असल्याने अपघातात मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहेत. नियमांचा अभाव, समर्पित देखरेख यंत्रणेची अंमलबजावणी आणि अवजड वाहनांची दैनंदिन तपासणी होत नाही, तोपर्यंत अपघातांचे प्रमाण कमी होणार नाही. – प्रांजली देशपांडे, अभ्यासक, रस्तासुरक्षा आणि अपघात.
गेल्या पाच वर्षांतील अपघातांची आकडेवारी
वर्ष – अपघात – मृत्यू
२०२१ – २३९ – २५५
२०२२ – ३१५ – ३२५
२०२३ – ३३४ – ३५१
२०२४ – ३३४ – ३४५
२०२५ – १९५ – १९९ (१ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २०२५)
शहरांमधून जाणाऱ्या महामार्गांवरील अपघात रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, अवजड वाहनांसाठी कालमर्यादा आणि ‘सीसीटीव्ही’द्वारे बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. पूर्वीपेक्षा अपघातांच्या आकडेवारीत घट होत आहे. – हिंमत जाधव, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा.