पुणे : रेल्वेच्या धडकेत दोन तरुणांसह एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री हडपसरमधील मांजरी भागात घडली. मृत्युमुखी पडलेले तिघे मांजरी भागातील रहिवासी आहेत. अपघात नेमका कसा झाला, याची माहिती पोलिसांना मिळू शकली नाही.
प्रथमेश नितीन तिंडे (वय १७), तन्मय महेंद्र तुपे (वय १९), तुषार विजय शिंदे (वय १९, तिघे रा. गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक, हडपसर) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. ‘मांजरी भागातील लोहमार्ग प्रथमेश, तन्मय, तुषार हे रविवारी (१६ नोव्हेंबर) रात्री सव्वाआठच्या सुमारास ओलांडत होते. त्यावेळी पुणे-दौंड या मार्गावरील रेल्वेगाडीने (डेमू) तिघांना धडक दिली.
अपघाताची माहिती मिळताच हडपसर पोलीस ठाण्यातील कर्मचारी, तसेच लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता,’ अशी माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.
अपघात नेमका कसा झाला,याची निश्चित माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मांजरी भागातील लोहमार्ग परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. पोलिसांनी तिघांच्या रक्ताचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले आहेत.
