पुणे : ‘पुण्यात शिवसेनेची ताकद आहे. पण आम्ही आतापर्यंत युती आणि आघाडीचे बळी ठरलो. प्रत्येक वेळी युती म्हणून पुण्याकडे दुर्लक्ष केले,’ अशी कबुली शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, ‘पुणेकरांना हवे असेल, तर येथे पूर्ण ताकदीने शिवसेना कामाला लावीन. तुम्ही जर प्रेमाने बोलाविले, तर मी पुण्यात येईन.’

महापालिकेची आगामी निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणून लढविणार येणार का, या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, ‘हा प्रश्न तिन्ही पक्षांनी सोडवला पाहिजे. लोकसभा आणि विधानसभा आम्ही एकत्र लढलो. तिन्ही पक्षांनी एकत्र लढले पाहिजे. मात्र, कोणाला स्वबळावर लढावेसे वाटले, तर तसे होऊ शकते. ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे. त्यामुळे स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांच्या भावनादेखील समजून घेऊ.’

‘पुणे शहराची ओळख काही वर्षांपूर्वी ‘विद्येचे माहेरघर’ अशी होती. आता मात्र ‘बिल्डरांची माहेरघरे’ अशी ओळख झाली आहे. पुणे शहराचा वाढत असलेला विस्तार पाहता सिंहावलोकन करण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरात उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा आणि वाढत असलेले शहरीकरण या तुलनेत नागरिकांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा पुरविण्यामध्ये अपयशी ठरत आहोत. आपण विकासाकडे चाललो आहोत, की विनाशाकडे हे पाहण्याची आवश्यकता आहे,’ असेही ठाकरे म्हणाले.

‘ठाकरे ब्रँडचा जन्म पुण्यात’

‘‘ठाकरे ब्रँड’ हा नवीन नाही. ठाकरेंचा इतिहास पाच ते सात पिढ्यांचा आहे. ठाकरे ब्रँड नावारूपाला आणला तो बाळासाहेब ठाकरे यांनी. त्या ठाकरे ब्रँडचा जन्म पुण्यात झाला. त्यामुळे पुणेकरांशी माझे जुने संबंध आहेत,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.