पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून एका घटस्फोटीत महिलेशी फसवणूक व जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला वाकड पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. विवाहित असलेला आरोपी अविवाहित असल्याचे सांगून विवाह जुळविण्याच्या संकेतस्थळावरुन खोट्या ओळखीने महिलांची फसवणूक करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आलोक अजयकुमार पुरोहित (वय ४३, शास्त्रीनगर, जयपूर) असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्यातील पीडित महिलेने २७ सप्टेंबर २०२५ रोजी फिर्याद दिली होती. आलोक याने वेगवेगळ्या विवाह जुळविण्याच्या संकेतस्थळावर स्वतःला अविवाहित दाखवून फिर्यादी महिलेशी ओळख वाढवली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला.

पुण्यात येऊन अत्याचार केला. यानंतर आलोकने फिर्यादीचे अश्लील छायाचित्र आणि चित्रफित काढून तिला धमक्या देत ‘ब्लॅकमेल’ करण्यास सुरुवात केली. तक्रार केल्यास छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी दिली. आलोकने महिलेचा मानसिक छळ केला होता.

तपासादरम्यान आलोक पुरोहित विवाहित असल्याचे समोर आले. तो विविध विवाह जुळविण्याच्या संकेतस्थळाव खोट्या माहितीच्या आधारे महिलांशी संपर्क साधून त्यांची फसवणूक करत असल्याचे उघड झाले आहे. फिर्यादी व्यतिरिक्त इतर महिलांनाही आरोपीने अशाच प्रकारे फसवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्‍याच्‍या वरिष्‍ठ निरीक्षक वनिता धुमाळ तपास करत आहेत.