पुणे : समाजमाध्यमात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी शुक्रवारी पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत गावात दोन गटांत झालेली दगडफेक आणि वाहनांच्या जाळपोळप्रकरणी पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी १७ जणांना अटक करण्यात आली असून, अन्य आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्या तरुणाला पाच ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

या प्रकरणात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेऊन त्याला अटक केली. त्याला शनिवारी दौंड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पाच ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

‘यवत गावात पोलीस बंदोबस्त तैनात आहे. शनिवारी गावात अनुचित घटना घडली नाही. ग्रामस्थांशी पोलिसांनी संवाद साधला आहे. शांतता बाळगावी, तसेच कायदा-सुव्यवस्थेला बाधा येईल, असे कृत्य करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. गावात राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी (एसआरपीएफ) तैनात आहे. याप्रकरणी पाच स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच १७ जणांना अटक करण्यात आली आहे. तोडफोड प्रकरणातील संशयित आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ३० जणांची ओळख पटविण्यात आली आहे’, असे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी सांगितले.

दरम्यान, या गावात समाजमाध्यमात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्यानंतर शुक्रवारी तणाव निर्माण झाला. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास दोन गट समोरासमोर आले. दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली. जमावाने वाहनांची तोडफोड केली, तसेच घरांवर दगडफेक केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. शुक्रवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गावास भेट दिली. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच शांतता पाळावी, असे आवाहन करण्यात आले.

पोलिसांचा ग्रामस्थांशी संवाद

या घटनेनंतर शनिवारी गावात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक रमेश चाेपडे, गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.

यवत गावात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. गावात शांतता आहे. बैठक घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला आहे. ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणू नये. – संदीपसिंग गिल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण पोलीस.