पिंपरी : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात गरीब रुग्णांना तातडीने उपचार, महागडी औषधे आणि साहित्य मिळावे, यासाठी ‘गरजू रुग्ण साहाय्यता निधी संस्थे’ची स्थापना करण्यात आली आहे. ही संस्था दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या, देणगीदारांकडून निधी स्वीकारणार आहे. त्या निधीतून गरजू रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.
पिंपरीतील संत तुकारामनगर येथे महापालिकेचे ७५० खाटांचे वायसीएम रुग्णालय आहे. येथे शहरासह राज्यभरातील रुग्ण उपचार घेतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गरीब रुग्णांना रुग्णालयाचे शुल्क भरणे शक्य होत नाही. अत्यावश्यक लागणाऱ्या बाबी, महागड्या तपासण्या, साहित्य रुग्णांचे नातेवाईक बाहेरून खरेदी करू शकत नाहीत. अशा रुग्णांच्या देयकात (बिल) सवलत देणे किंवा पूर्ण माफ करणे एवढाच पर्याय असतो.
रुग्णालयात दरवर्षी सरासरी ५० हजार रुग्ण आंतररुग्ण कक्षात तर, चार लाख ५० हजार रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतात. गरजू रुग्णांना देयकात सवलत दिली जाते किंवा माफ केले जाते. आधुनिक उपचारपद्धती, साधने, साहित्य, औषधे या सर्वांचा पुरवठा वायसीएम रुग्णालयात तातडीने करणे शक्य होत नाही. तातडीच्यावेळी औषधे, साहित्य वैद्यकीय तपासणी गरजू रुग्णांना उपलब्ध करून देणे, शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य तत्काळ रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालय स्तरावर गरजू रुग्ण साहाय्यता निधी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
गरजू रुग्णांच्या उपचारार्थ आर्थिक मदत करू इच्छिणारे देणगीदार, दानशूर व्यक्ती, संस्था, खासगी कंपन्या, मंडळांकडून देणगी, मदत निधी, धनादेश या संस्थेच्या नावाने स्वीकारले जाणार आहेत. जमा झालेल्या निधीतून गरजू रुग्णांवर वायसीएम रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहे. हा निधी केवळ गरजू रुग्णांच्या उपचारासाठी खर्च केला जाणार आहे.
दूरदर्शन, दुचाकी, चारचाकी असल्यास लाभ नाही
दूरदर्शन, वॉशिंग मशिन, वातानुकूलित यंत्रणा, दुचाकी, चारचाकी, जमीन असलेल्या रुग्णांना या संस्थेतून लाभ दिला जाणार नाही. ही उपकरणे नसल्याचा अर्ज रुग्णाकडून भरून घेतला जाणार आहे. आवश्यकता वाटल्यास महापालिकेचे कर्मचारी घरी जाऊन अर्जातील माहिती खरी असल्याची खात्री करणार असल्याचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांनी सांगितले.
आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळ
या संस्थेत आयुक्त संचालक तथा अध्यक्ष असणार आहेत. अतिरिक्त आयुक्त, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, प्रशासन अधिकारी आणि समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) हे सहा संचालक असणार आहेत.
सेवाभावी संस्था, कंपन्या मदत देऊ इच्छितात. काही रुग्णही मदत करण्याची इच्छा व्यक्त करतात. त्यासाठी ही संस्था स्थापन केली आहे. यातून गरजू रुग्णालाच मदत केली जाईल. – डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठता, वायसीएम रुग्णालय.
वायसीएममध्ये उपचारासाठी येणाऱ्या गरजू रुग्णांना या संस्थेच्या निधीतून मदत केली जाईल. त्यामुळे रुग्णावरील आर्थिक ताणही कमी होईल. – विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.