‘मणिपूर : चंद्राची अंधारलेली बाजू’ हा ‘समोरच्या बाकावरून’ सदरातील पी. चिदम्बरम यांचा लेख (१५ सप्टें.) वाचला. मणिपूरच्या जनतेचा ना मुख्यमंत्री वीरेंद्रसिंह यांच्यावर विश्वास राहिलेला आहे ना तेथील पोलीस प्रशासनावर. अशीच अशांत परिस्थिती एखाद्या भाजपविरोधी सरकार असलेल्या राज्यात उद्भवली असती तर केंद्रातील भाजप सरकारने केव्हाच राष्ट्रपती राजवट लागू केली असती. पंतप्रधान मोदींनी स्वत: जरी मणिपूरला भेट दिली तरी मणिपूरमधील जनतेत एकप्रकारचा विश्वास तयार होईल आणि शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल. मोदींना युक्रेन-रशिया संघर्ष मिटवण्यास, जगभरातील विविध देशांना भेटी देण्यास, इतकेच काय परंतु जम्मू-काश्मीर, हरियाणातील निवडणूक प्रचारास, महाराष्ट्रातील विविध योजनांचे उद्घाटन करण्यास, वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यास वेळ आहे, परंतु मणिपूरमधील हिंसाचार कमी करण्यास, आपल्याच देशातील जनतेला भेटण्यास मात्र वेळ नसावा हे अनाकलनीय आहे. – शुभदा गोवर्धन, ठाणे

काँग्रेसने टीकेपेक्षा हातभार लावावा

‘मणिपूर : चंद्राची अंधारलेली बाजू’ हा लेख अरण्यरुदनाचा नवीन प्रकार वाटतो. भारतात सर्वात जास्त काळ काँग्रेस पक्षाने राज्य केले आणि त्या काळात ईशान्य भारताकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आले. तेव्हा काँग्रेसने वा त्यांच्या पंतप्रधानांनी ईशान्य भारताला वा मणिपूरला कितीदा भेट दिली होती? मणिपूरबद्दल नक्राश्रू ढाळणाऱ्या काँग्रेसला आत्मपरीक्षणाची नितांत आवश्यकता आहे. मणिपूरचा प्रश्न फक्त पंतप्रधान वा गृहमंत्र्यांच्या भेटीने सुटणार नसून तिथल्या सर्व जाती जमातींमध्ये सलोखा स्थापित करण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न करणे आवश्यक आहे… त्यात विरोधी पक्षांनी हातभार लावला तर सोन्याहून पिवळे होईल. – माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)

येचुरींचे संसदपटुत्व

‘उजवा डावा!’ हे संपादकीय (१४ सप्टेंबर) वाचले. सीताराम येचुरींचे लिखाण मी माझ्या कुवतीनुसार वेळोवेळी वाचले आहे; त्यापैकी विशेषत: विष्णूच्या अवतारांसंबंधी त्यांनी जे विवेचन केले आहे, त्याचे महत्त्व आत्ताच्या परंपरा, पुराणे व एकूण धार्मिक वातावरणात असामान्य आहे. २००५ ते २०१७ या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्य होते. संसदेचे थेट प्रक्षेपण सुरू झाल्यामुळे त्यांची भाषणे पाहता/ऐकता यायची. स्मरणीय भाषणे अनेक आहेत पण २०१५ मध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार-ठरावाच्या वेळचा प्रसंग संसदपटुत्वाची साक्ष देणारा. ‘विश्वमित्र’ आपल्या भाषणानंतर सभागृहातून निघून गेले. पण त्यानंतर राज्यसभा हादरली- ‘भ्रष्टाचार रोखण्यात आणि काळा पैसा परत आणण्यात सरकारचे अपयश’ या विषयावरील आपल्या दुरुस्तीवर मतविभाजनाची मागणी येचुरी यांनी लावून धरली आणि ती दुरुस्ती बहुमताने मंजूर झाली. सरकारचा हा तांत्रिक पराभव जिव्हारी लागल्यानेच त्या दिवसापासून अहंकारी ‘विश्वमित्रां’नी अत्यंत जरुरीचे नसेल तेव्हा राज्यसभेत येणे जवळपास बंद केले, असे राजकीय निरीक्षण आहे. पण येचुरींच्या वागण्या- बोलण्यात कधीही विखार नव्हता. – संजय चिटणीस, मुंबई

सार्वजनिक व खासगी यांत फरक!

सरन्यायाधीशांच्या घरी गणपतीच्या पूजा/ आरतीला पंतप्रधान मोदींनी उपस्थित राहण्यावरून समाजमाध्यमांवर वाद निर्माण झाल्यानंतर भाजपच्या प्रवक्त्यांनी व नेत्यांनी शिरस्त्याप्रमाणे भूतकाळ उकरून काढत मनमोहन सिंग यांच्या इफ्तार पार्टीत तत्कालीन सरन्यायाधीश उपस्थित राहिल्याचा दाखला दिला. मनमोहन सिंगांनी तेव्हा ही पार्टी सार्वजनिकरीत्या आयोजित केली होती व त्यात इतरांप्रमाणे सरन्यायाधीशही उपस्थित होते ही बाब लक्षात घ्यायला हवी.चंद्रचूड यांच्या घरचे गणपतीपूजन ही त्यांची खासगी बाब ठरते. त्यातही यजमानाने आरतीचे तबक हाती घेण्याची सर्वसाधारण प्रथा असताना मोदींनी तो मानही स्वत:कडे घेतल्याने टीकेला आणखीच धार चढली. अमित शहांप्रमाणे लालबाग वा तत्सव सार्वजनिक गणपतीच्या दर्शनाला मोदी गेले असते तर वाद निर्माण झाले नसते. – डॉ. किरण गायतोंडे, चेंबूर (मुंबई)

…आगंतुकाप्रमाणे जाणार नाहीत!

देशाचे पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी गणेशदर्शनाला जाण्याआधी राजशिष्टाचारानुसार पंतप्रधान कार्यालयाकडून या भेटीची सूचना सरन्यायाधीशांच्या कार्यालयास निश्चितच गेली असणार. पंतप्रधान पदावरील व्यक्ती आगंतुकाप्रमाणे निश्चितच जाणार नाही. येणाऱ्या पाहुण्याचे स्वागत करणे ही आपली संस्कृती असून ती सरन्यायाधीशांनी जपली हेच विरोधकांच्या टीकेचे उत्तर आहे. – अॅड. सुरेश पटवर्धन, कल्याण</strong>