संतोष भिमराव राजगुडे
मी सध्या पुण्यात असतो. आता पुणे म्हटलं की अशा, आकांक्षा, स्वप्नांची गर्दी आणि तरीही काहींसाठी हे आयुष्याचा उत्तरार्ध व्यतित करण्यासाठीचं ठिकाण. या गजबजलेल्या शहरात, कॉलेजचे तास, अभ्यासाचा ताण आणि भविष्याची स्वप्नही असतात, पण या सगळ्या प्रवासात माझ्या मनाच्या कोपऱ्यात मात्र एकच विचार वारंवार डोकावतो, तो म्हणजे माझा शेतकरी बाप, माझं तांदुळवाडी सारखं छोटसं गाव, माझं घर, माझं शेत.
शहरातल्या स्वार्थी गर्दीत शिक्षण घेत असताना गावाकडच्या आपल्या काळ्या आईच्या मातीचा अंदाज कधीकधी घेता येत नाही. पण हेच शेताचं दृश्य माझ्या डोळ्यांपुढे नेहमीच उभं राहतं. बापाचं शेत, त्याच्या घामाच्या प्रत्येक थेंबाने आणि काळजीने जोपासलेलं, आज अवकाळी पावसाने त्यात चिखल झालाय. त्याच्या चेहऱ्यावरचं गडद सावट, डोळ्यांतले अश्रू आणि त्या गढूळ मातीच्या ओंजळीतली अशा… हे दृश्य मी शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही, पण ते माझ्या मनात नेहमीच जिवंत राहतं.
तो वर्षभर सूर्याच्या उष्णतेत आणि पावसाच्या धारांत ताठ मानाने उभा राहिला. पेरलेल्या प्रत्येक बिजाला जिवंत ठेवण्यासाठी, जोपासण्यासाठी राबला. माझ्या अभियांत्रिकीच्या फीपासून ते घरच्या सणावारापर्यंत, सगळ्या स्वप्नांचा पाया त्याच्या वर्षभराच्या कष्टांवरच उभा राहिला होता. गावाकडे अतिवृष्टी झाल्याचं कळलं आणि माझं काळीज भरून आलं. त्या काही तासांत बापाच्या वर्षभराच्या कष्टांचा पट नजरेसमोरून झरझर निघून गेला. बापाने सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात घाम गाळला. उन्हाच्या तापात दिवसभर उभा राहिला. अंगाची कातडी खरवडली, हाताला घट्टे आले, पण मनात आशेचा दिवा होता. या वर्षी पीक चांगलं येईल. त्याचाच आधार घेऊन त्याने माझ्या शिक्षणाच्या फी बरोबरच दिवाळीत नवीन कपडे घेण्यापर्यंतची सगळी स्वप्न रंगवली होती.
पण आता? आता पिकं जमिनीत नाहीशी झाली आहेत. अंगणात मातीऐवजी दलदल आहे. बापाच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास, जो मला नेहमी धीर देतो, त्यावर आज हतबलतेचं सावट पसरलं आहे. फोनवर बापाचा आवाज ऐकताना हतबलतेचा सूर माझ्या हृदयावर घाव घालून गेला; “पिकं गेली रे… आता काय करू?” मी पुण्यात पुस्तकं वाचतो, बऱ्याच वक्तृत्व स्पर्धांत भाग घेतो, लिखाण करतो, अभियांत्रिकीचं शिक्षण घेतो, इतिहास समजावा म्हणून गडकिल्ल्यांचा फेरफटकाही कधीतरी मारतो आणि मीही माझ्या बापाप्रमाणे भविष्याचं स्वप्न रोजच रंगवतो. पण त्याच वेळी माझं मन गावच्या शेतात, मातीत नेहमीच आहे. मला वाटतं, माझं शिक्षण, करिअर, झं आयुष्य हे सगळं बापाच्या घामावर उभं आहे. पण आज त्याच्या घामाचं मोल पावसाने हिरावून नेलंय. हे सारं आज माझ्यासारख्या कित्येक शेतकरी पुत्रांना अस्वस्थ करून सोडणारं आहे.
बाप हतबल आहे पण मला ठाऊक आहे, तो हार मानणार नाही. इथल्या सरकार माय- बापालासुद्धा एक कळकळीची विनंती आहे की जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवून वातानुकुलीत कार्यालयाच्या चार भिंतीच्या बाहेर शेतकऱ्यांच्या बांधापर्यंतसुद्धा येऊन पाहणी करा. मग समजेल, पिझ्झा बर्गर खाण्याइतकं शेतकऱ्याचं आयुष्य सोपं आणि सरळ नाही. वेळेत पंचनामे करून माझ्या शेतकरी बापासारख्या कित्येक शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या. नाहीतर या कृषीप्रधान भारत देशाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी हा शेतकरी जिवंत दिसणार नाही. असं झालं तर अर्थव्यवस्थेचं काय होईल?
पण माझा शेतकरी बाप पुन्हा उभा राहील, पुन्हा बी टाकेल, पुन्हा जमिनीवर विश्वास ठेवेल. आणि मी? मी माझं अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण करून पुढे जाईन, पण त्याच वेळी माझी शेतीबद्दलची भूमिका सकारात्मक असेल. शेतकऱ्याचं धैर्य प्रत्येकाने आपापल्या कार्यक्षेत्रात दाखवलं पाहिजे. मी त्याचं हे धैर्य माझ्या आयुष्याचं सर्वात मोठं प्रेरणास्थान मानतो.
आज अवकाळी पावसाने माझ्या बापाला फक्त हतबल केलेलं नाही, तर माझ्या शेतकरी बापासारख्या कित्येक शेतकरी मायबापांना अस्वस्थ, निराश आणि हतबल करून सोडलं आहे. पण मला विश्वास आहे माझ्या शब्दांत, माझ्या श्वासांत आणि माझ्या प्रत्येक यशात माझा बाप आहे. तो प्रत्येक शेतकरी बापाचा प्रतिनिधी. त्याच्या हतबल डोळ्यांतील वेदना आणि पुन्हा उभं राहण्याची ताकद, हे दोन्ही आज माझ्यासारख्या तरुणांना एक संदेश देतात की स्वप्नं रंगवा, शिक्षण घ्या, करिअर घडवा पण मातीच्या ओंजळीतलं कर्ज कधी विसरू नका.
(लेखक भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय, नऱ्हे पुणे येथे विद्यार्थी आहे.)