कल्याण : कल्याण शिळफाटा रस्त्यावर शनिवारी रात्री ट्रक खाली चिरडून एक अडिच वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ट्रक चालक ट्रक घटनास्थळी सोडून पळून गेला. मानपाडा पोलिसांनी ट्रक जप्त केला आहे. फरार ट्रक चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.कविश जयंत झांबरे (अडिच महिने) असे ट्रक खाली चिरडून मरण पावलेल्या बालकाचे नाव आहे. कविश आपल्या कुटुंबीयांसह डोंबिवली पूर्वेतील नांदिवली टेकडीवरील नांदिवली हेल्थ व्ह्यू सोसायटीत राहत होता. या मृत्यूप्रकरणी कविशचे वडील जयंत झांबरे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी ट्रक चालका विरूध्द भारतीय न्याय संहितेच्या सन २००३ १०६ (१), २८१( सह मोटार वाहन कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती, अशी की तक्रारदार जयंत झांबरे हे शनिवारी रात्री गोळवली येथील पेट्रोल पंपावर आपल्या बुलेट दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आले होते. बुलेटवर जयंत यांच्यासह त्यांचा मुलगा कविश होता. कविश जयंत यांच्या पाठीमागील आसनावर बसला होता. पेट्रोल भरून झाल्यानंतर जयंत झांबरे कल्याण शिळफाटा रस्त्यावरून आपल्या घराकडे जाण्यास निघाले. ते शिळफाटा रस्त्यावरील सोनारपाडा येथील डोंबिवली नागरी सहकारी बँकेसमोरील रस्त्यावरून जात असताना, अचानक भरधाव वेगात असलेल्या एका ट्रकने जयंत झांबरे यांच्या बुलेटला पाठीमागून जोराची धडक दिली.या धडकेत जयंत यांच्या पाठीमागे बसलेला अडिच वर्षाचा कविश झांबरे बुलेटवरून रस्त्यावर फेकला गेला. आणि काही क्षणात त्याच्या अंगावरून ट्रकचे पुढचे चाक गेले.

जयंत बुलेटसह रस्त्यावर ट्रकच्या धडकने भरकटले गेले. पादचारी आणि इतर नागरिकांनी ओरडा करून ट्रक चालकाला ट्रकखाली बालकाचा मृत्यू झाल्याचा इशारा केला. तो पुढे जाऊन थांबला. काही क्षणात नागरिकांची अपघातस्थळी गर्दी झाली. आता आपण या गर्दीत येथे थांबलो तर लोकांचा आपणास मार बसेल या भीतीने ट्रक चालकाने तेथून गुपचूप पळ काढला. इतर नागरिक त्याला शोधत होते. पण तेथे तो दिसला नाही. मानपाडा पोलीस तातडीने घटनास्थळी आले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यात आला. कविशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात पाठविण्यात आला. ट्रक रेती आणि कचने भरलेला होता.पोलिसांनी पंचनामा करून रेती कचसह ट्रक जप्त केला. या ट्रकच्या चालकाची माहिती काढून ती पोलिसांनी या अपघाताची माहिती त्यांना कळवली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.