ठाणे : ठाणेकरांना नवे पर्यटन केंद्र, मनोरंजन आणि विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध व्हावे या उद्देशातून ठाणे महापालिका आणि महाराष्ट्र मरिटाईम बोर्ड यांच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या गायमुख चौपाटीचा काही भाग खचल्याचा प्रकार बुधवारी समोर आला. याठिकाणी धोकापट्टी लावून नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या निमित्ताने चौपाटीच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दरम्यान, एक ते दिड महिन्यापुर्वीच हा भाग खचला असून त्याची आयआयटीच्या पथकाने पाहाणी केल्याचे महाराष्ट्र मरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणेकरांना नवे पर्यटन केंद्र, मनोरंजन आणि विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध व्हावे या उद्देशातून ठाणे महापालिका आणि महाराष्ट्र मरिटाईम बोर्ड यांनी संयुक्तपणे घोडबंदरच्या गायमुख खाडी किनारी भागात चौपाटी उभारली. ज्या जागेवर गायमुख चौपाटी उभारण्यात आली आहे, ती जागा मेरिटाइम बोर्डाची आहे. ठाणे महापालिकेने या प्रकल्पासाठी तसेच त्याच्या जोड कामांसाठी सुमारे १२ कोटी ८४ लाख निधी दिला आहे. मेरिटाइम बोर्डाने या चौपाटीचे काम केले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव या चौपाटीला देण्यात आले आहे. या चौपाटीचे उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ऑगस्ट २०१९ मध्ये झाले होते. या चौपाटीचा खाडीलगतचा काही भाग खचल्याची छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित झाली. या चौपाटीवर नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. यामुळे खचलेल्या भागात अपघात होऊ नये यासाठी येथे धोकापट्टी लावून परिसरात प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वृत्तास महाराष्ट्र मरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. एक ते दिड महिन्यांपुर्वी चौपाटीचा काही भाग खचला आहे. त्याचवेळेस त्याठिकाणी धोकापट्टी लावून तो परिसर प्रवेश बंद करण्यात आला आहे. खचलेल्या भागाची आयआयटीच्या पथकाकडून पाहाणी करण्यात आली असून त्याचा त्यांनी अहवालही दिला आहे.

हेही वाचा… ठाण्यात शुक्रवारी पाणी नाही

हेही वाचा… ठाणे, डोंबिवलीतील गुंतवणूकदारांची चार कोटीची फसवणूक

खाऱ्या पाण्यामुळे खाडीलगतच्या खांबामधील लोखंड गंजल्याने हा प्रकार घडला असून याठिकाणी आयआयटीने सुचविल्याप्रमाणे दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यासाठी साडे तीन कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून येत्या दोन दिवसात हा प्रस्ताव मंजुर होऊन लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल, असे महाराष्ट्र मरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A part of gaimukh chowpatty in thane was damaged asj