डोंबिवली : २७ गावची स्वतंत्र नगरपालिका झालीच पाहिजे, या मागणीसाठी शुक्रवारी सर्व पक्षीय ग्रामीण संघर्ष समितीतर्फे कल्याण शिळफाटा रस्त्यावरील भागाशेठ वझे चौक भागात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजप, मनसे, राष्ट्रवादी काँँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि संघर्ष समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. शिंदे शिवसेनेचे स्थानिक ज्येष्ठ पदाधिकारी या आंदोलनापासून अलिप्त राहिले होते.
२७ गावांसाठी सर्व पक्षीय ग्रामीण संघर्ष समितीचे आंदोलन म्हणजे यापूर्वी स्थानिक नेतृत्व गुलाब वझे, चंद्रकांत पाटील, अर्जुनबुवा चौधरी, गणेश म्हात्रे, जालिंदर पाटील यांची उपस्थिती प्राधान्याने असायची. ही मंडळी आता गावच्या लढ्यापासून दूर राहत असल्याने जुनेजाणते खासगीत नाराजी व्यक्त करत आहेत. पक्षीय चढाओढ असली तरी या मंडळींनी गावच्या अस्तित्वासाठी या आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे, अशी चर्चा आंदोलनाच्या ठिकाणी सुरू होती.
या आंदोलनात मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे, काँग्रेसचे प्रदेश नेते संतोष केणे, युवा पदाधिकारी प्रणव केणे, संघर्ष समितीचे सत्यवान म्हात्रे आणि इतर पदाधिकारी सहभागी झाले होते. २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका झालीच पाहिजे. कल्याण डोंबिवली पालिकेत आम्हाला राहायचेच नाही, अशी आक्रमक भूमिका यावेळी आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. या आंदोलनामुळे शिळफाटा रस्त्यावर मानपाडा भागात काही काळ कोंडी झाली होती.
मागील ४० वर्षापासून २७ गावे आपल्या हक्क आणि विकासासाठी लढत आहेत. गावांना आपले अस्तित्व राखण्यासाठी त्यांचा मागणीचा विचार झालाच पाहिजे. गावांमध्ये यापूर्वी ग्रामपंचायत होती. आता वाढत्या लोकसंख्येप्रमाणे गावांनी स्वतंत्र नगरपालिकेची मागणी केली आहे. त्यात त्यांची चूक नाही. या मागणी संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. गावांमध्ये नागरी विकासाची कामे न झाल्याने गावे विकासापासून वंचित राहिली आहेत. त्यांना त्यांच्या हक्काप्रमाणे नगरपालिका मिळालीच पाहिजे, असे भाजप आमदार किसन कथोरे यांनी सांगितले.
आपण यापूर्वी २७ गावांचे नेतृत्व केले आहे. अतिशय दिलदार मनाचा असा हा मतदारसंघ आहे. आंदोलन कोण करतय यापेक्षा येथल्या लोकांची मागणी काय आहे हे महत्वाचे आहे. त्यामुळे विकासाची दृष्टी ठेऊन आपण या आंदोलनात सहभागी झालो आहोत, असे आमदार कथोरे यांनी सांगितले. २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. या भागातील नागरिक गप्प बसणार नाही. या गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेसाठी प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा खासदार म्हात्रे यांनी दिला.
