ठाणे : २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनंत तरे यांना ठाणे विधानसभेमधून उमेदवारी हवी होती. तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या आग्रहास्तव रवींद्र फाटक (सध्या शिंदे गटाचे उपनेते) यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अनंत तरे हे कमालीचे नाराज झाले होते. या निवडणुकीत रवींद्र फाटक यांचा पराभव झाला आणि ‘शिवसेनेचे ठाणे’ या समीकरणाला धक्का बसला.

तत्पूर्वी चिडलेल्या अनंत तरे यांनी कोपरी-पाचपाखाडी या एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातूनच अपक्ष अर्ज दाखल केला. मात्र ‘मातोश्री’च्या सांगण्यावरून तरे यांनी आपला अर्ज मागे घेतला. परंतु त्यावेळी अनंत तरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याविषयी काही वक्तव्य केली होती. ही वक्तव्य आजही समाजमाध्यमावर प्रसारित होत असतात.

शिवसेनेचे उपनेते दिवंगत अनंत तरे यांच्या जीवनावर आधारित अनंत आकाश अर्थात आठवणीतले अनंतर तरे या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. अनंत तरे म्हणाले होते, हा माणूस एक दिवस दगा देईल आणि तेच झाले. कधी कधी निष्ठेचे मुखवटे लावून काहीजण आपल्या भोवती अनेकजण फिरत असतात, त्यामुळे नकळत त्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आता घालीन लोटांगण करुन ‘वाचवा-वाचवा’ असा हंबरडा फोडणारी माणसे आज दिसली नसती, त्यावेळी तरेंचे ऐकले असते तर पश्चाताप झाला नसता, अशी कबुली उद्धव ठाकरे यांनी दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अनंत तरे यांच्या वक्तव्याची चर्चा रंगू लागली आहे.

कोण होते अनंत तरे ?

अनंत तरे हे माजी आमदार होते. त्यांनी ठाण्याचे महापौर पददेखील भूषविले होते. ते कोळी समाजातील एक मोठे नेते आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणार होते. अनंत तरे यांनी १९९३ ते १९९६ असे सलग तीनवेळा महापौर पद भूषविले. तसेच, रायगड जिल्ह्यातून शिवसेनेकडून दोनवेळा लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला. २००० ते २००६ या कालावधीत ते विधान परिषदेचे सदस्य होते. त्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेचे उपनेते पद दिले होते. तसेच ते एकविरा देवीस्थान संस्थेचे अध्यक्षही होते. २०२१ मध्ये त्यांचे निधन झाले.

काय म्हणाले होते तरे?

ठाणे शहरात तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये ठाणे शहर-कोपरी पाचपाखाडी आणि ओवळा माजिवडा मतदारसंघाचा सामावेश आहे. ठाणे शहर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला ओळखला जात होता. परंतु २०१४ मध्ये या मतदारसंघातून काँग्रेसमधून शिवेसनेत प्रवेश केलेल्या रविंद्र फाटक यांना उमेदवारी देण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांच्या आग्रहास्तव ही उमेदवारी दिली गेली होती. या मतदारसंघात भाजपचे संजय केळकर यांनी फाटक यांचा परभव केला. तत्पूर्वी या मतदारसंघातून अनंत तरे देखील निवडणूक लढविण्यास इच्छूक होते. परंतु फाटक यांना उमेदवारी जाहीर झाल्याने तरे हे कमालीचे चिडले होते. त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्याविरोधातच दंड थोपटले.

त्यांनी कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला त्यांची प्रतिक्रिया दिली होती. अनंत तरे म्हणाले होते की, आम्ही ४० वर्ष कष्टाने काम करणारे कार्यकर्ते आहोत. बाळासाहेबांच्या आशिर्वादाने महापौर, आमदार झालो. आतापर्यंतचा इतिहास आहे मला संघटनेकडून आतापर्यंत कोणतीही जिंकलेली जागा देण्यात आली नव्हती. आठ वर्ष महापौरपद असलेले मी खेचून आणले होते. रायगडमधूून विधान परिषद मिळाली होती. ती कधीच संघटनेचे कोणी जिंकले नव्हते. ती मी जिंकलो होतो. केंद्रीय मंत्री अंतुल यांच्यासमोर लोकसभा निवडणूकीत केवळ दोन हजार मतांनी माझा पराभव झाला होता. मी निष्ठेने वागणारा कार्यकर्ता असल्याचे तरे म्हणाले होते.

शिवसेना ही शिवसेना प्रमुख चालवायचे

शिवसेना प्रमुख असताना ते शिवसेना चालवायचे तशीच चालविली गेली पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी ती चालवायला हवी. परंतु उद्धव ठाकरे एक निर्णय घेतात आणि तो निर्णय बदलला जातो. ही बाब खेदजनक असल्याचे तरे म्हणाले होते. निष्ठावंताना टांगणीला लावण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले असेही ते म्हणाले.

मी लोकसभा लढविली तेव्हा एकनाथ शिंदे नगरसेवकपण नव्हते

मी जेव्हा रायगडला लोकसभा निवडणूक लढविली. त्यावेळी एकनाथ शिंदे हे नगरसेवक देखील नव्हते. कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार फक्त मातोश्रीला आहे. बाळासाहेबांना होता, तोच अधिकार उद्धव ठाकरे यांना आहे. आम्ही जर निर्णय घ्यायला लागलो तर संघटनेचे तुकडे-तुकडे होणार असे देखील ते म्हणाले होते.

हे दुसरे नारायण राणे होतील

माझी नाराजी ही उद्धव ठाकरे यांच्यावर नाही तर एकनाथ शिंदे यांच्यावर आहे. मी उद्धवजींना सांगितले आहे, एकनाथ शिंदेंना आवरा, अन्यथा हा दुसरे नारायण राणे होतील. हे फक्त आपले-आपले निवडतात. बाकिच्यांना कामाला लावत आहेत. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात ठाणे जिल्ह्यामध्ये बंड झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आहे असेही ते म्हणाले.