ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या कल्याण ग्रामीण या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यास शिवसेना (शिंदे गट) कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना यश आले असून शिवसेनेचे राजेश मोरे यांनी तब्बल ६५ हजारांहून अधिक मतांची आघाडी घेऊन विजय मिळवला आहे. तर राजेश मोरे यांच्या विजयामध्ये खासदार डॉ.शिंदे यांचा अत्यंत मोलाचा वाटा असून कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेने (शिंदे गट) हा एक हाती विजय खेचून आणला आहे. शिवसेनेचे राजेश मोरे यांना मतमोजणीच्या ३० व्या फेरीअंती  १ लाख ३६ हजार २३७ इतकी मते पडली आहेत तर राजू पाटील यांना ७१ हजार ७८३ इतकी मते पडली आहेत. तर शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे सुभाष भोईर यांना ६७ हजार ३९० मत पडली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीवेळी ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि मुख्यमंत्री पुत्र डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेऊन प्रचार केला होता. तर खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रचारासाठी मनसेचे राजू पाटील आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली होती. खासदार डॉ.शिंदे यांना मिळालेल्या सुमारे १ लाखांहून अधिकच्या मताधिक्यात राजू पाटील यांचा देखील मोलाचा वाटा होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीवेळी याची परतफेड करून शिवसेनेकडून (एकनाथ शिंदे) मनसेला साथ दिली जाईल अशी चर्चा सर्वत्र होती. मात्र मनसेचे एकमेव आमदार असलेल्या राजू पाटील यांच्या विरोधात कल्याण ग्रामीण  विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून राजेश मोरे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आणि शिवसेना आणि  मनसैनिकांमध्ये द्वंद्व दिसून आले. मात्र कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची विजयाची जबाबदारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या खांद्यांवर घेत आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात जंग जंग पछाडून राजेश मोरे यांचा जोरदार प्रचार केला.

हेही वाचा >>>मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर आनंदोत्सव; कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी

तर विजयात मोलाची भूमिका बजावलेल्या २७ गावांसाठी घेतलेल्या अनेक महत्वाच्या निर्णयांचा अधिकाधिक प्रचार केला. राजू पाटील यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची दिवा शहरात जाहीर सभा देखील पार पडली होती. मात्र त्याचेही काहीच परिणाम या ठिकाणी दिसून आले नाही. त्यामुळे मनसेला आपला एकमेव बालेकिल्ला असलेला कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ देखील गमवावा लागला.  तर शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे सुभाष भोईर यांचे देखील तगडे आवाहन होते. मात्र दोन्ही तुल्यबळ उमेदवारांना पराभूत करत राजेश मोरे यांनी विजय प्राप्त  केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assembly election 2024 kalyan rural constituency mns raju patil defeated amy