ठाणे : हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाज हा अनुसूचित जमातीचा घटक असूनही महाराष्ट्र सरकार त्यांच्यावर अन्याय करत असल्याचा आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी ठाण्यातील मोर्चात केला. बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करा, नाहीतर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. आजचा मोर्चा हा सेमीफायनल आहे, आणि १७ ऑक्टोबरला मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात आरक्षणाचा फायनल एल्गार होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्याच गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा ‘आदिम जमात’ असा स्पष्ट उल्लेख असून, त्यांना अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याची मागणी या समाजाकडून होत आहे. या मागणीसाठी राज्यभर बंजारा समाज मोर्चे काढत आहे. त्याच मोहिमेचा भाग म्हणून ठाण्यातील कापूरबावडी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. “आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे”, “जय सेवालाल”, “एक गोर सव्वा लाखेर जोर” अशा घोषणा देत शेकडो बंजारा बांधव, महिला आणि लहान मुले पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते. या मोर्चात बंजारा नेते शंकर पवार, नंदू पवार, कविराज चव्हाण, सुभाष राठोड, छाया राठोड, राकेश जाधव, सुधीर राठोड, अनिल राठोड, कैलास राठोड यांच्यासह हजारो बांधव सहभागी झाले होते.
आम्हाला एसटीचा दर्जा द्यावा
हैदराबाद गॅझेट हे नोंदीचं नव्हे तर पुराव्याचं दस्तऐवज आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला जसा ‘कुणबी’ म्हणून दर्जा मिळाला, तसाच आमचा बंजारा समाज कर्नाटक, आंध्रप्रदेशमध्ये अनुसूचित जमातीत समाविष्ट आहे. आमच्याकडे संविधानातील लिस्ट, मंडल आयोगाचा उल्लेख आणि ऐतिहासिक पुरावे आहेत. शासनाने तातडीने जीआर काढून आम्हाला एसटीचा दर्जा द्यावा,” असे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी मोर्चाला संबोधित करताना सांगितले.
शिवाजी पार्कवर बंजारा समाजाची ताकद दाखवू
मोर्चानंतर राठोड यांनी पुढील आंदोलनाची रूपरेषाही जाहीर केली. ६ ऑक्टोबरला लातूर-यवतमाळ, ७ ऑक्टोबरला परभणी-जळगाव, ८ ऑक्टोबरला धुळे, १० ऑक्टोबरला नाशिक-वर्धा आणि अलिबाग येथे मोर्चे होणार आहेत. त्यानंतर १७ ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर बंजारा समाजाची ताकद दाखवून देणारा “फायनल एल्गार” पार पडणार आहे, असे त्यांनी सांगितले.