ठाणे : शहर झोपडपट्टीमुक्त व्हावे आणि येथील रहिवाशांचा रहाणीमानाचा दर्जा उंचावावा, या उद्देशातून मुंबई महानगर क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन (झोपू) योजना राबविण्यात येते. परंतु विविध तांत्रिक अडचणी, रहिवाशांचे वाद किंवा विकासकाकडून अडवणुक यामुळे अनेक ठिकाणी झोपू योजनेचे प्रकल्प रखडलेले असून अशाचप्रकारे खोपट भागातील झोपूचा प्रकल्प गेले १९ वर्षे रखडलेल्यामुळे रहिवाशी हवालदिल झाले होते.

दरम्यान, भाजपचे आमदार संजय केळकर यांनी या संदर्भात बैठक घेऊन या प्रकल्पाला चालना दिल्याने १०७ कुटूंबियांना १९ वर्षानंतर दिलासा मिळाला आहे.

खोपट परिसरातील आनंद आझाद हाउसिंग सोसायटीची झोपडपट्टी पुनर्वसन योजना गेली १९ वर्षे ठप्प आहे. येथील १०७ कुटुंबे हक्काच्या घरांपासून वंचित राहिल्याने ते भयभीत आहेत. या दीर्घ काळात विकासक बदलले पण इमारत काही उभी राहिली नाही. विशेष म्हणजे दबावाखाली रहिवाशांना तक्रार करणेही दुरापास्त झाले होते.

अखेर येथील रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन त्यांची व्यथा मांडली. त्यानंतर आमदार केळकर यांनी तातडीने शासकीय विश्रामगृहात विकासक, एसआरए अधिकारी आणि रहिवाशांची संयुक्त बैठक घेत चर्चा केली. यावेळी एसआरएचे अधिकारी राजकुमार पवार, बांगर आणि विकासक यांच्यासह अनेक रहिवासी उपस्थित होते. यात प्रामुख्याने महिलांचा जास्त सहभाग होता.

विकासकाने दिले बैठकीत आश्वासन

गेल्या १९ वर्षांत झालेली फरफट आणि विकासकांचा भोंगळ कारभार यामुळे कुटुंबांची झालेली वाताहत याचा पाढा रहिवाशांनी बैठकीत वाचला. यानंतर आमदार केळकर यांनी अधिकाऱ्यांना सूचना देत विकासकाला देखील १५ दिवसांची मुदत दिली. यावेळी विकासकाने १५ दिवसांत बांधकाम सुरू करण्याचे आश्वासन दिले.

विकासक याकामी असमर्थ ठरल्यास स्वयं पुनर्विकासाची योजना हाती घेऊ, असा इशाराही केळकर यांनी दिला. सुमारे दोन तास झालेल्या चर्चेत सकारात्मक तोडगा निघाल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.

घर मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही

शहरात अनेक ठिकाणी पुनर्वसनाच्या आणि पुनर्विकासाच्या योजना विकासकामुळे रखडल्या असून रहिवाशांना भाडेही मिळत नाही आणि हक्काचे घरही मिळत नाही. या योजनांना चालना देण्यात आम्हाला यश येत असून खोपट येथील शेकडो रहिवाशांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे. त्यांना घरे मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असे आमदार केळकर यांनी स्पष्ट केले.