BengaliCommunity ठाणे : घोडबंदर भागात गेले २३ वर्षांपासून न्यू बंगाल क्लब, ठाणे या मंडळातर्फे साजरी होणारी दुर्गापूजा यंदा बोरिवली बोगद्याच्या कामामुळे स्थलांतरित करण्याची वेळ आयोजकांवर आली आहे. दुर्गापूजामुळे विकासकामात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये आणि जागेच्या कमतरते अभावी यंदाची दुर्गापूजा उपवन तलाव मैदान येथे आयोजित करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

पश्चिम बंगालमध्ये दुर्गा उत्सवाची परंपरा मोठी आहे. बंगाली भाषकांच्या जीवनपद्धतीचा हा उत्सव एक अविभाज्य भाग आहे. नोकरी आणि व्यवसायानिमित्त अनेक पिढ्यांपासून मुंबई आणि ठाणे शहरात आलेली बंगाली भाषकांची दुर्गासंस्कृतीची मुळं खोलवर रुजली आहेत. दुर्गा उत्सव हा ठाणे जिल्ह्याचा भाग बनला आहे. ठाणे, दिवा तसेच नवी मुंबई शहरात दुर्गा उत्सवाची व्याप्ती वाढली असून हा दुर्गा उत्सव सर्वच नागरिकांचे आकर्षण बिंदू आहे.

विशेष म्हणजे, ठाणे शहरात बंगाली भाषकांची संख्या सर्वाधिक असून शहरातील विविध ठिकाणी हे वास्तव्यास आहेत. या भाषकांनी शहरातील विविध ठिकाणी समिती स्थापन करुन दुर्गा उत्सवाचे आयोजन केले जाते. गेले वर्षानुवर्षे हा दुर्गा उत्सव ठाणे शहरात मोठ्या उत्साहात आयोजित केला जात आहे.

नवरात्रौत्सवाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच पंचमीला बंगाली भाषकांचा नवरात्रौत्सव सुरु होतो. या दुर्गा उत्सवाचे आणखी एक आकर्षण म्हणजे देवीचा देखावा असतो. प्रत्येक मंडळ वेगवेगळ्या संकल्पना घेऊन हा देखावा करत असतात. मोठे मंडप त्याला आकर्षक अशी सजावत, विद्यूत रोषणाई यामुळे अनेकांना या देवीच्या दर्शनाला येण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळे भल्या मोठ्या जागेत या दुर्गाउत्सवाचे आयोजन केले जाते.\

घोडबंदर भागात देखील न्यू बंगाल क्लब, ठाणे यांच्यावतीने गेले २३ वर्षे या दुर्गा उत्सवाचे आयोजन केले जात होते. ठाण्यातील सर्वात मोठ्या दुर्गापूजांपैकी हा एक उत्सव मानला जातो. परंतू, यंदा या आयोजकांवर दुर्गापूजेचे स्थळ बदलण्याची वेळ आली आहे. घोडबंदर भागात सध्या सुरु असलेले महत्त्वपूर्ण प्रकल्प हे या मागचे कारण आहे. ज्या ठिकाणी हा दुर्गाउत्सव साजरा व्हायचा त्या ठिकाणी सध्या बोरिवली बोगद्याचे काम सुरु आहे. त्या कामामुळे मोठमोठे ट्रक याठिकाणी उभे केले जात आहे. यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. तसेच मोठ्याप्रमाणात प्रदूषण देखील होत आहे. याकारणामुळे नेहमीच्या ठरलेल्या ठिकाणी दुर्गापूजा करणे शक्य नसल्यामुळे आयोजकांनी स्वइच्छेने यंदाचा दुर्गाउत्सव उपवन येथील मैदान आयोजन करण्याचे ठरविले आहे.

नवीन दुर्गापूजा स्थळ

उपवन तलावाजवळील मैदान, नीलकंठ हाइट्स गिरीजा बिल्डिंग शेजारच्या गल्लीत, पोखरण रोड क्र. २, ठाणे (पश्चिम) ४००६०६ याठिकाणी ही दुर्गापूजा साजरी केली जाणार आहे. यंदा न्यू बंगाल क्लब, ठाणे आयोजित दुर्गापूजेचे २४ वे वर्षे आहे. यानिमित्त क्लबने पश्चिम बंगालमधील एक भव्य वास्तूशिल्प असलेल्या कूचबिहार पॅलेसचा देखावा साकरण्याचे ठरविले आहे.

या दुर्गापूजेसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. ज्या जागेवर गेली वर्षानुवर्षे पुजा होते, त्याठिकाणी सध्या बोरिवली बोगद्याचे काम सुरु आहे. याकामामुळे दुर्गापूजेसाठी जागा अपुरी पडत आहे. जरी या जागेत आयोजन केले तरी नागरिकांना गाड्या पार्किंगची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे विकासकामात कोणत्याप्रकारचा अडथळा नको आणि जागेच्या कमतरते अभावी आम्ही स्वइच्छेन दुर्गापूजेसाठी यंदाच्या स्थळात बदल केला.- प्रबीर चौधरी, अध्यक्ष न्यू बंगाल क्लब, ठाणे.