ठाणे : मुंबई आणि ठाणे शहरातील अनेक गृहप्रकल्प रखडल्यामुळे येथील नागरिकांना राहण्यासाठी शहराबाहेर जावे लागले आहे. हे गृहप्रकल्प राज्य शासनाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा विचार असून त्यामुळे शहरांबाहेर गेलेल्यांना लवकरात लवकर परत आणण्याचे काम आपले सरकार करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सोमवारी ठाण्यातील समूह विकास योजनेच्या (क्लस्टर डेव्हलपमेंट) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे शहरातील बेकायदा धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी समूह विकास योजना (क्लस्टर) राबविण्यात येणार आहे. ठाण्याच्या किसननगरमधील दुर्घटनाग्रस्त साईराज इमारतीमधील रहिवाशांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, की सुरुवातीला ‘क्लस्टर योजना’ मला स्वप्नवत वाटत होती. साईराज इमारत कोसळून त्यात १८ जणांचा मृत्यू झाला. दरवर्षी पावसाळय़ात इमारती कोसळण्याच्या घटना घडत होत्या. अधिकृत इमारतींसाठी योजना असते पण अनधिकृत इमारतींसाठी योजना नव्हती. अनेक वर्षे सुरू असलेल्या लढय़ानंतर योजनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होत आहे. क्लस्टरचा शुभारंभ माझ्या आयुष्यातील आनंदाचा दिवस आहे. पण, मी समाधानी नाही. ज्यावेळेस नागरिकांना हक्काच्या घराच्या चाव्या देईन, तेव्हा मला सर्वाधिक आनंद होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री पदावर कार्यरत असताना देवेंद्र फडणवीस यांनी क्लस्टर योजना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी खूप सहकार्य केले आणि अभ्यास करून प्रकल्पातील त्रुटी दूर केल्या. त्यामुळे या प्रकल्पात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, असेही शिंदे यांनी नमूद केले.

शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र स्विकारल्यानंतर ठाणे शहरामध्ये बदल घडायला लागले आहेत. क्लस्टर योजना सर्वसामावेशक पद्धतीने तयार करण्यात आली असल्याचे ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. केवळ भूमिपूजन नाही तर उद्यापासून येथे प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. येथील बांधकाम फॅब्रिकेटेड टेक्नॉलॉजीने होणार आहे, असे सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाचे टप्पे

’ किसननगर येथे योजनेचा पहिला टप्पा राबविण्यात येत असून यामध्ये दहा हजार घरांचा समावेश आहे.

’ त्यानंतर शहरातील लोकमान्यनगर, किसननगर, आनंदनगर सह अन्य भागांत योजना टप्प्याटप्प्याने राबविण्यात येईल.

’ पावसाळय़ानंतर मिरा-भाईंदरमध्ये योजनेचा आरंभ होईल.

’ त्यानंतर भिवंडी, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई तसेच महामुंबईत बेकायदा धोकादायक इमारती असलेल्या ठिकाणी योजना राबविली जाईल.

निवडणुका आल्यावर मी क्लस्टर मुद्दा हाती घेतो, अशी टीका अनेकजण करतात. पण, आता कोणत्याच निवडणुका नाहीत. मी आरोपांना आरोपाने नाही तर, कामाने उत्तर देतो, हा माझा स्वभाव आहे. – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister eknath shinde inaugurate cluster development scheme in thane zws