Thane Mumbai Navi Mumbai CNG Shortage Disrupts : मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात सीएनजी इंधनाच्या तुटवड्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी नागरिकांचे हाल झाले. ठाणे रेल्वे स्थानकातील सॅटीस पुलावर प्रवाशांच्या बसगाड्यांसाठी रांगा लागल्या होत्या. अनेक नोकरदारांनी पायपीट करत तीन हात नाका गाठला. तर काहींना रिक्षा प्रवास करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर (आरसीएफ) कंपाऊंडमधील गॅस अथाॅरिटी ऑफ इंडिया (गेल) मुख्य गॅस पुरवठा वाहिनीमध्ये नुकसान झाले. त्याचा परिणाम महानगर कंपनीच्या सीटी गेट स्टेशनच्या (सीजीएस) गॅस पुरवठ्यावर झाला. त्यामुळे सीएनजी इंधनाचा तुडवडा झाला. त्याचा परिणाम ठाणे जिन्ह्यातील नवी मुंबई आणि ठाणे शहरातील विविध सीएनजी पंपवर दिसून येत आहे.
महानगर कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाणे शहरात सीएनजी इंधनावर आधारीत ३१ पंप आहेत. तर नवी मुंबई शहरात ३४ पंप आहेत. रविवारी रात्रीपासून या पंपवर रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी महानगर कंपनीने सीएनजीचा पुरवठा विभागणी करुन पुरवठा केला जात होता. परंतु त्याचे प्रमाण कमी होते. तर काही पंपवर पुरवठाच बंद होता. त्यामुळे रिक्षा चालक तसेच इतर वाहन चालकांची सीएनजी पंपवर इंधन मिळावे यासाठी अक्षरश: शोधा-शोध सुरु होती.
सोमवारी तर संपूर्ण दिवस रिक्षा चालक आणि कॅब चालकांना सीएनजी पंपवर रांगा लावून मन:स्ताप सहन करावा लागला. सोमवारी सांयकाळी घरी परताना प्रवाशांना रिक्षा उपलब्ध होऊ शकल्या नाही. त्यामुळे टीएमटीच्या बसगाड्यांवर प्रवाशांचा प्रचंड भार निर्माण झाला होता. बसगाड्या भरून जात असल्याने महिला. तसेच इतर वृद्ध प्रवाशांना गर्दीचा सामना सहन करावा लागला. मंगळवारी सकाळी देखील अशीच परिस्थिती राहीली.
अनेक सीएनजी पंपवर सीएनजी इंधन उपलब्ध नसतानाही केव्हा तरी इंधन मिळेल या आशेने रिक्षा चालक रांगेत उभे होते. नोकरदारांनाही वेळेत रिक्षा उपलब्ध करणे शक्य झाले नसल्याने त्यांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. बसगाड्यांच्या थांब्यांवरही प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच बसगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी दिसत होती. कामाच्या ठिकाणी वेळेत पोहचू का अशी चिंता त्यांना सतावत होती.
