Eknath Shinde criticism Uddhav Thackeray Shiv Sena: ठाणे : घोडमैदान जवळ आहे, ठिकऱ्या कुणाच्या उडतील हे ठाण्यातील जनता दाखवून देईल. कारण जे स्वत:च्या विचारांवर, भूमिकेवर ठाम राहत नाहीत त्यांचा बँड जनता वाजवत असते. त्यांनी आनंद दिघे यांचा अपमान केलेला आहे. बाळासाहेब आमच्या हृदयात आहेत आणि आनंद दिघे आमच्या रक्तात आहेत. ज्यांनी शिवसेना विकली, त्यांना जनता टिकली देईल, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

 ठाण्यातील कोपरी भागातील अष्टविनायक चौक येथे शनिवारी रात्री ‘दिवाळी पूर्वसंध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

 काही लोक वर्षभर घरात असतात आणि निवडणूक आली की लोकांच्या दारात जातात. पण मी आणि आमचे शिवसैनिक वर्षभर लोकांच्या दारात जातात आणि  मदतीचा हात देतात, असे शिंदे यांनी सांगितले. महायुती लोकसभा, विधानसभेमध्ये जिंकली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येदेखील महायुतीचाच भगवा फडकेल, असेही शिंदे म्हणाले.