ठाणे : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव का लागले पाहिजे याविषयी ठाणे शहरातील विविध गावठाण, कोळीवाडे येथील प्रत्येक ठाणेकर भूमिपुत्रांमध्ये जागृकता निर्माण करण्यासाठी कोळी समाजाने नवरात्रौत्सवात ठाणे शहरात दिबा जागर यात्रा सुरु केली आहे.
नवरात्रौत्सव मंडळात ही दिबा जागर यात्रा राबविली जात आहे. दिबा जागर यात्रेचा उद्देश, दिबा पाटील यांच्या सामाजिक राजकीय कार्याची महती सांगितली जाते. नुकतीच ही दिबा जागर यात्रा चेंदणी कोळीवाडा, वाघबीळ येथे पार पडली. कोपरी, बाळकुम, कासारवडवली, कोळीवाडा, मोघरपाडा, ओवळा, भाईंदरपाडा, कळवा, ढोकाळी याठिकाणी दिबा जागर यात्रा आयोजित केली जाणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्या विशेष चर्चेत आहे. या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे यासाठी आगरी-कोळी भूमीपुत्र समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. मध्यंतरी शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी एक बाईक रॅली काढत या समाजातील भावनांना वाट करुन दिली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव मिळण्यासाठी मागचे पाच ते सहा वर्षे आंदोलन सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी या विमानतळाच्या उद्घाटन ३० सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल असे जाहीर करण्यात आले होते. परंतू, त्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी ३० सप्टेंबरला विमानतळाचे उद्घाटन होणार नाही अशी माहिती माध्यमांना दिली. परंतू, अद्याप विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव दिले जाईल याबाबत कोणतिही स्पष्टता मिळालेली नाही.
यापार्श्वभूमीवर दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला मिळावे या भूमिपुत्रांच्या हक्काच्या लढ्यासाठी ठाण्यातील गावठाणे, कोळीवाडे आणि पाड्यांमधून एक ऐतिहासिक जनजागृती मोहीम सुरू झाली आहे. “दिबा जागर यात्रा” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या यात्रेची सुरुवात घोडबंदर रोडवरील वाघबीळ गावातून झाली. भूमिपुत्र आणि समाजबांधव यांच्या सहभागातून ही यात्रा गावा-गावांत पोहोचणार आहे.
नवरात्रौत्सवाच्या आरत्या-गरब्यानंतर मंडळांच्या मार्गदर्शनानुसार या यात्रेतून दिबा पाटील यांच्या राजकीय तसेच सामाजिक कार्याची १० मिनिटांत माहिती दिली जाणार असून, “दिबा पाटील साहेब विमानतळ नामकरण” या विषयावर नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती केली जाणार आहे. या यात्रेची सुरुवात २३ तारखेपासून वाघबीळ येथून झाली त्यानंतर, २४ तारखेला ही यात्रा ठाणे पूर्व येथील चेंदणी कोळीवाडा सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळात पार पडली. या यात्रेत विविध सामाजिक, समाज, जमात संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी सर्व ठाणेकर भूमिपुत्रांचे चेंदणी कोळीवाडा सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचे अध्यक्ष कुणाल भोईर , उपाध्यक्ष मिलिना कोळी चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट चे उपाध्यक्ष हेमंत कोळी यांनी मानाची कोळी टोपी घालून स्वागत करून यात्रेला शुभेच्छा दिल्या.
ही यात्रा केवळ आंदोलन नसून भूमिपुत्रांच्या भावना आणि अस्मितेचा जागर असल्याचे समाजबांधवांनी स्पष्ट केले आहे. तसेच यापुढे कोपरी, बाळकुम, कासारवडवली, कोळीवाडा, मोघरपाडा, ओवळा, भाईंदरपाडा, कळवा, ढोकाळी याठिकाणी दिबा जागर यात्रा आयोजित केली जाणार आहे.
यात्रेचे महत्त्वाचे मुद्दे
- १) विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव का द्यावे?
- २) संसद व विधानसभेतील त्यांचे लढाऊ राजकीय कार्य
- ३) नवी मुंबई विमानतळ नामकरणाची सद्यस्थिती