कल्याण – गेल्या दहा दिवसांपासून दगड, माती, विटा मेहनत घेऊन घर, सोसायटीच्या आवारात बांधलेल्या, रंगरंगोटी केलेल्या गड, किल्ल्यांवर परतीच्या पावसाच्या जलधारा गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दररोज संध्याकाळी कोसळत असल्याने किल्ले बांधणी करणाऱ्या कल्याण, डोंबिवली परिसरातील मुलांचा हिरमोड झाला आहे.

दिवाळी आली की फटाके फोडण्या बरोबर दिवाळी निमित्त आकर्षक हुबेहुब किल्ला बांधणी करण्यास मुले मग्न असतात. आणि एक वेगळा आनंद या किल्ले बांधणीतून मुले घेतात. घर परिसरातील दगड गोटे, विटा, माती आणायची. हाता पाणी, मातीमधील चिखलात माखून मग जीवतोडून आकर्षक किल्ला होईल यासाठी प्रयत्न करायचे. यामध्ये मुले, मुली समर्पित भावाने काम करतात.

गेल्या पंधरा दिवसांपासून कल्याण, डोंबिवली परिसरातील अनेक सोसायटी, चाळींच्या समोर, झोपडपट्ट्यांमध्ये मुले मातीचे किल्ले उभारणीचे काम करत आहेत. आपल्या किल्ल्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळेल यासाठी मुले आटोकाट प्रयत्न करत आहेत. काही मुलांनी आकर्षक किल्ले बांधणी केली.

गेल्या तीन दिवसांपासून संध्याकाळी पाच वाजल्यानंतर अचानक आकाशात काळे ढग दिसू लागतात. काही वेळाने वारा सुरू होतो. बघता बघता विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू होतो. अर्धा ते एक तासात या जलधारा मुलांच्या किल्ल्यांवर कोसळून किल्ल्याची माती एका धारेत वाहून नेत आहेत. काही मुलांनी किल्ल्यांची रंगरंगोटी केलेली पण ती रंगरंगोटी पावसाने बेरंग करून टाकल्याने मुलांचा हिरमोड झाला आहे.

एवढी मेहनत घेऊन अचानक येणारा पाऊस दररोज किल्ल्याची वाताहत करत असल्याने अचानकच्या पावसातून किल्ल्यांचे कसे संरक्षण करायचे या विवंचनेत मुले आहेत. अनेक मुलांनी सोसायटी पदाधिकाऱ्यांकडून पैसे घेऊन किल्ले बांधणीवर पाऊस आला तर झाकण म्हणून ताडपत्री, गोणपाट खरेदी करून आणली आहेत.

बहुतांशी किल्ले मातीचे आहेत. त्यामुळे पावसाचा मारा सुरू झाला की माती वाहून जाते. त्या खालील दगड, विटा उघड्या पडतात. अलीकडे माती पण सहज मिळत नाही. ते मोकळ्या मैदानातून आणावी लागते. मागील दोन ते तीन वेळा आलेल्या पावसाने आमचे नुकसान केले. असा हा पाऊस आमच्या किल्ल्यांची किती दिवस वाताहत करणार. आमची दिवाळी तरी सुखाने जाऊ दे. आमच्या किल्ल्याला प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळू दे, अशी भावना व्यक्त करत नाऊमेद न होता पावसाने झोडपुनही मुले पुन्हा किल्ला उभारणीच्या कामात लागत आहेत.

पाऊस आला तर त्याला काही होणार नाही यासाठी त्याच्यावर ताडपत्री आणि संरक्षित वस्तू ठेऊन किल्ल्याच्या बचावासाठी प्रयत्न करत आहेत.
अशीच परिस्थिती बाजारात फटाके विक्री करणाऱ्या फटाके विक्रेत्यांची झाली आहे. मुसळधार पाऊस सुरू झाला की कापडी मंडप गळण्यास सुरूवात होते. एक थेंब जरी फटाक्यांच्या खोक्यावर पडला तरी खोक्यातील फटाके खराब होतात. भिजलेली वस्तू ग्राहक ओळखतो. त्यामुळे तो त्या खोक्याला हात लावत नाहीत, अशी खंत फटाके विक्रेत्यांनी व्यक्त केली.

कल्याण, डोंबिवलीतील अनेक बेरोजगार मुले फटाके विक्रीचा व्यवसाय करत आहेत.