ठाणेः मध्य रेल्वेवरील डोंबिवली आणि अंबरनाथ ही दोन्ही स्थानके प्रवाशांनी सदैव गजबजलेली असतात. स्थानक परिसरातील वेगवेगळे रिक्षा थांबे, फेरिवाले, पार्किंग आणि इतर वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यात वाढती प्रवासीसंख्या यामुळे येथील वाहतूक कोंडी हा नागरिकांसाठी गंभीर प्रश्न ठरलेला आहे. आता या दोन्ही रेल्वे स्थानकांवर सॅटीस प्रकल्प उभारला जाणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएच्या मुख्यालयात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यावर सकारात्मक निर्णय झाला. ठाण्याच्या धर्तीवर या दोन्ही स्थानकांबाहेर स्वतंत्र सॅटिस प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

एमएमआरडीएच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत डॉ. शिंदे यांनी या प्रकल्पांना तातडीने मंजुरी देऊन कामांना गती देण्याचे स्पष्ट निर्देश दिले. विशेष म्हणजे, डोंबिवली आणि अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसरात सॅटीस प्रकल्प उभारण्यासाठी चर्चा झाली. सध्याच्या घडीला डोंबिवली स्थानकाबाहेर कोंडी वाढली आहे. प्रवाशांची संख्या वाढलेली असताना त्यांना स्थानकापर्यंत येण्यातच मोठा संघर्ष करावा लागतो. रिक्षांची वाढलेली संख्या, फेरिवाले, विक्रेते, इतर वाहने यांची मोठी संख्या येथे पाहायला मिळते. त्यामुळे प्रवाशांना, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. या भागातून शहराच्या विविध भागात पोहोचण्यासाठी मोठा वेळ खर्ची घालावा लागतो. त्यामुळे या भागात वाहतूक व्यवस्थापन करण्यासाठी सॅटीस प्रकल्प गरजेचा आहे.

या प्रकल्पावर तातडीने काम सुरू करावे. त्यासाठी आवश्यक प्रकल्प आराखडा कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने तयार करावा, अशा सूचना यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केल्या. त्यावर पालिकेने आराखडा तयार केल्यास एमएमआरडीए त्यात सहकार्य करेल, असे आश्वासन एमएमआरडीए प्रशासनाने दिले. तर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनीही यावर सकारात्मक प्रतिसाद दिला.
याचप्रमाणे अंबरनाथ रेल्वे स्थानकाबाहेर सॅटीस प्रकल्पाचाही आढावा यावेळी घेण्यात आला. अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या परिसरातील वाहनतळांच्या जागांचा समावेश करून पूर्व, पश्चिम असा संलग्न सॅटीस उभारला जाणार आहे. त्यासाठी सध्याचे अर्धवट बांधल्या गेलेल्या पूर्वेतील वाहनतळाचाही समावेश आहे. या जागा एकत्र करून येथे एमएमआरडीए प्रशासन सॅटीस बांधणार आहे. त्याला गती देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. त्यामुळे स्थानक परिसरातील प्रवाशांना आणि वाहनचालकांना दैनंदिन वाहतूककोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे.

बैठकीत केवळ सॅटिस प्रकल्पांपुरतेच नव्हे, तर भविष्यातील व्यापक वाहतूक व्यवस्थेबाबतही चर्चा झाली. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्ग आता अंबरनाथ-बदलापूर दरम्यानच्या चिखलोली स्थानकापर्यंत वाढवला जाणार आहे. त्यामुळे उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि चिखलोली परिसरातील प्रवाशांना थेट कल्याण, ठाणे आणि मुंबई गाठणे सुलभ होणार आहे. या आढावा बैठकीला एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल, आमदार राजेश मोरे, आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.