डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेत ठाकुरवाडी भागातील बेडेकरी गल्लीमध्ये रविवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या दरम्यान गरब्यामध्ये दांडिया खेळत असलेल्या एका तरूणावर चार जणांनी अचानक चाॅपर, लोखंडी सळईने हल्ला करून गंभीर जखमी केले. या तरूणाच्या पाठीला चाॅपर हल्ल्याने गंभीर दुखापत झाली आहे. या गुन्ह्या प्रकरणात गंभीर जखमी झालेल्या तरूणाच्या तक्रारीवरून पोलीसांनी चार जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
कुणाल विजय कुशाळकर (१९) असे गंभीर जखमी तरूणाचे नाव आहे. तो आपल्या कुटुंबीयांसह शास्त्रीनगर रुग्णालया मागील कोपर छेद रस्त्यावरील शिवशक्ती चाळ भागात राहतो. त्याचे वडील रिक्षा चालक आहेत. कुणालच्या तक्रारीवरून पोलिसांनी दिपेश टेकाळे, भैय्या काऊतर, अभय खाडे आणि अन्य एक अशा चार जणांच्या विरूद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमाने गुन्हा दाखल केला आहे. कुणाल हा घरपोच वस्तू विक्री व्यवसायात एका खासगी कंपनीत वितरण कर्मचारी म्हणून काम करतो.
कुणाल कुशाळकर याने पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की मी आणि माझे मित्र सनी राठोड, रोहित मोखळे, चंदन सरदार रविवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या दरम्यान डोंबिवली पश्चिमेतील ठाकुरवाडी मधील बेडेकर गल्लीतील गरबा कार्यक्रमात दांडिया खेळत होतो. मी दांडियात खेळत असताना बाजुच्या भागात मोठ्याने ओरडण्याचा आवाज येत होता. त्या भागातील लोक भांडण करत बेडेकर गल्लीतील गरब्याच्या ठिकाणी एकमेकांशी भांडत आले. त्यांच्यात जोरदार रेटारेटी सुरू होती. यावेळी माझे मित्र सनी राठोड, चंदन सरदार आणि रोहित गरब्याच्या बाजूला रस्त्यावर उभे होते.
दरम्यान, अन्य भागातून भांडण करत आलेल्या तरूणांनी अचानक सनी, चंदन आणि रोहित यांना मारहाण सुरू केली. आपल्या मित्रांना मारहाण होत आहे हे पाहून मी दांडिया खेळण्याचे सोडून धावत रस्त्यावर धावत आलो आणि माझ्या मित्रांना मारहाण करणाऱ्या तरूणांच्या तावडीतून सोडवू लागलो.
यावेळी गुन्हा दाखल दीपेश टेकाळे, भैय्या काऊतकर आणि अभय खाडे यांनी आपण पाठमोरे उभे असताना आपल्यावर पाठी मागून चाॅपरने हल्ला केला. आपण गंभीर जखमी झालो. त्याच वेळी आपल्या बाजूला असलेल्या रोहित मोखळे याच्या पाठ आणि पायावर या तिघांनी चाॅपरने हल्ला करून त्यालाही जखमी केले.
या तीन मारेकर्यांच्या जोडीला असलेल्या एका अनोळखी इसमाने आपल्या ताब्यातील लोखंडी सळईने आपल्यावर हल्ला केला आणि आपणास गंभीर जखमी केले. त्या इसमाला आपण ओळखू शकलो नाही. आपणावर हल्ला केल्यानंतर चौघे जण तेथून पळून गेले. कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्री नगर रुग्णालयात आपण उपचार घेतले.
आपला मारहाण प्रकरणाशी काही संबंध नसताना आपणास आणि मित्राला चार जणांनी निष्कारण मारहाण करून हल्ला केल्याने कुणाल कुशाळकर याने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.