डोंबिवली – बाजारपेठेचा भाग असलेल्या डोंबिवली पूर्वेतील बापूसाहेब फडके वर्दळीच्या रस्त्यावर मागील पाच दिवसांपासून एक मोटार बंद पडलेल्या अवस्थेत उभी करून ठेवण्यात आली आहे. ही मोटार या रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरत आहे. या मोटारीमुळे स्थानिक दुकानदार त्रस्त आहेत. कोणीही मोटार या रस्त्यावरून हटवत नसल्याने वाहतूक विभागाने या मोटीरीच्या मालकावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक व्यापाऱ्यांनी केली आहे.
बापूसाहेब फडके रस्ता हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावरून अलीकडे चालण्यास जागा नसते. रिक्षा, खासगी वाहने, बस यांची या रस्त्यावर वर्दळ असते. अशा परिस्थितीत फडके रस्त्यावर माॅर्डन कॅफे हाॅटेलच्या समोरील भागात पदपथाला खेटून एक मोटार गेल्या पाच दिवसांपासून उभी आहे. ऐन दिवाळीच्या दिवसात हे वाहन मुख्य वर्दळीच्या रस्त्याने मोटार कार चालकाने आणून ठेवल्याने पादचारी, व्यापारी त्रस्त आहेत.
सकाळ, संध्याकाळ या मोटारीमुळे इतर वाहनांना अडथळा होत आहे. त्यामुळे ही मोटार खेचून अन्य भागात नेण्यात यावी अशा तक्रारी काही व्यापारी, नागरिकांनी वाहतूक विभागाला केल्या आहेत असे समजते. दिवाळी निमित्त खरेदीदारांची सकाळ, संध्याकाळ गर्दी असते. या गर्दीला, या भागातील रस्त्यावरील विक्रेत्यांना या गर्दीचा त्रास होत आहे.
वाहतूक पोलीसांनी पुणे आरटीओ नोंदणी क्रमांक असलेल्या या वाहनाला टोईंग व्हॅनच्या माध्यमातून आपल्या वाहतूक विभागाच्या वाहनतळावर नेऊन उभी करावी, अशीही मागणी नागरिक करत आहेत. या वाहनामुळे स्थानिक दुकानदारांना आपली दुचाकी वाहने उभी करण्यात अडथळे येत आहेत.
फडके रस्ता हा डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी एकेरी मार्ग आहे. परंतु, अनेक वाहन चालक या रस्त्यावर वाहतूक पोलीस नाहीत पाहून विरूध्द मार्गिकेतून वाहने आणून या रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी करतात. अनेक वाहने फडके रस्त्यावरून के. बी. विरा शाळेकडे वळण घेतात. ही वाहने वळण घेत असताना फडके रस्त्यावर कोंडी होती. त्याचवेळी बाजीप्रभू चौकात केडीएमटीच्या बस, रिक्षा पाठोपाठ उभ्या असतात. त्यामुळे फडके रस्त्यावरून रेल्वे स्थानकाकडे जाणारी वाहतूक खोळंबून राहते.
त्यात या धूळखाव मोटारीची भर पडल्याने प्रवासी त्रस्त आहेत. रिक्षा चालकही या मोटारीवर कारवाई करावी म्हणून वाहतूक पोलिसांकडे मागणी करत आहेत. ही मोटार पाच दिवसांपासून एकाच जागी उभी असल्याने या मोटारीवर धुळीचा थर साचले आहेत.
