डोंबिवली – नाट्य क्षेत्र आणि रंगभूमीवर ५५ वर्षाहून अधिक काळ कार्यरत असलेले डोंबिवलीतील ज्येष्ठ रंगकर्मी सुधाकर श्रीनिवास इनामदार यांचे रविवारी येथे वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी प्रमिला, दोन विवाहित मुलगे, मुलगी, जावई, नातवंंडे असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा मिलिंद इनामदार हे नाट्य क्षेत्रात कार्यरत आहेत. ते मुंबई विद्यापीठाच्या ॲकेडमी ऑफ थिएटर्स येथे मार्गदर्शन करतात.
नाट्य कलेचा प्रचार आणि प्रसाराठी सुधाकर इनामदार यांनी नाट्य दुदुंभी नावाची संस्था स्थापन केली होती. या संस्थेच्या माध्यमातून त्यांंनी ६० वर्ष नाट्यविषयक विविध उपक्रम राबविले. हौशी, गुणवान कलाकार म्हणून सुधाकर इनामदार यांची ओळख होती. ते ‘सुश्री’ या नावाने ओळखले जात होते. ते कवी होते. ‘माणुसकीचा पाझर’, ‘माणुसकीचे गेंद फुलावे’, हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत.
सुधाकर इनामदार मुळचे सातारा जिल्ह्यातील वरूड गावचे. शिक्षण, नोकरीनिमित्त ते कुटुंंबीयांसमवेत मुंबईत आले. त्यानंतर ते डोंबिवलीत स्थायिक झाले. भारतीय आयुर्विमा महामंडळात त्यांनी आपली नाट्य कलेची आवड जोपासत वरिष्ठ साहाय्यक म्हणून सेवानिवृ्तीपर्यंत नोकरी केली. नाट्य दुदुंभी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शंभरहून अधिक नाटके, एकांकिकांमधून भूमिका साकारल्या. अनेक नामवंत नाट्य कलाकारांच्या जोडीने काम केले.
नामवंत नाटककारांच्या नाटकासह स्वलिखित ६० हून अधिक नाटकांचे लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन केले. ‘यंदा कर्तव्य आहे’ या स्वलिखित विनोदी बहुपात्री नाटकाचे १०० हून अधिक प्रयोग सुश्रींनी केले. ‘प्रेमाची गोष्टच निराळी,’ ‘प्रश्न संस्काराचा आहे,’ अशा सामाजिक आशयाची नाटके त्यांनी लिहिली. ३५ हून अधिक नाटकांचे लेखन सुश्रींनी केले. विविध वृत्तपत्रांमध्ये नाट्यविषयक ४०० हून अधिक लेख लिहिले. अनेक नाट्यविषयक कार्यक्रमांमध्ये ते परीक्षक म्हणून काम करत होते.
अखिल भारतीय नाट्य परिषद, मराठी नाटककार संघ, डोंंबिवली साहित्य सभा, नाट्यरसिक मंडळ, ज्येष्ठ नागरिक महासंघ, डोंबिवली ग्रोग्रासवाडी, नाट्यकट्टा अशा संस्थांमध्ये त्यांचा नियमित वावर होता. डोंबिवली, कल्याणमधील नवोदित कलाकार, नाट्य संस्थांना ते मार्गदर्शन करायचे. डोंबिवलीत झालेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलन संयोजनाता सुश्रींचा मोलाचा वाटा होता. नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे आदर्श डोंबिवलीकर पुरस्कारासह ते ३० हून पुरस्कारांचे मानकरी होते. ‘कवडी चुंबक,’ ‘वरचा मजला रिकामा,’ ‘तीन चोक तेरा,’ ‘असा मी काय गुन्हा केला,’ ‘रंगू डुलत डुलत जाय,’ अशी विनोदी, व्यावसायिक नाटके सुश्रींनी सादर केली. डोंबिवलीतील रखडलेले सावित्रीबाई फुले नाट्यमंदिर पूर्ण व्हावे यासाठी त्यांनी नाट्यसंस्थेच्या माध्यमातून प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.
डोंबिवली, कल्याण शहर परिसरातील नवोदित कलाकार, एकांकिका सादर करणाऱ्या कलाकारांसाठी नाट्य भवन असावे, अशी त्यांची अनेक वर्षांची मागणी होती. ते शासन, कल्याण डोंबिवली पालिकेत अनेक वर्ष या मागणीचा पाठपुरावा करत होते. ही मागणी शासकीय लालफितीमुळे मान्य होऊ शकली नाही. त्यांच्या निधनाबद्दल अनेक नाट्य रंगकर्मींनी शोक व्यक्त केला आहे.