डोंबिवली – घरातील आजोबांच्या मोबाईलचा गुप्त संकेतांक (पीन) बदलण्यावरून डोंबिवली जवळील खोणी पलावा येथील कासा एड्रियाना सोसायटीत भाड्याने राहत असलेल्या एका कुटुंबात जोरदार राडा झाला. यावेळी घरातील आजोबा, मुलगा यांनी एकत्रितपणे घरातील ४७ वर्षाच्या कुटुंबप्रमुख महिलेला स्वयंपाक घरातील कडीवाला तवा, चामड्याच्या पट्ट्याने रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. या मारहाणीत ही महिला आणि तिचा एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एवढा गंभीर गुन्हा घडूनही मानपाडा पोलीस ठाण्यातील गुन्हा दाखल करून तपास करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने किरकोळ कलमे टाकून या गु्न्ह्याची नोंद करून घेतली. खुनाच्या प्रयत्नाचा हा गंभीर गुन्हा असुनही गुन्हा घडून चार दिवस उलटले तरी तपास अधिकारी या प्रकरणातील आरोपींना अटक करत नव्हता. या प्रकरणाला गती मिळेल यादृष्टीने प्रयत्न करत नव्हता.

अखेर डोंबिवलीतील एका जाणत्या नागरिकाने ठाणे पोलीस आयुक्त, कल्याण पोलीस उपायुक्तांना यासंदर्भात कळविले. डोंबिवली भाजपच्या महिला ग्रामीण संघटक मनीषा राणे यांनी मानपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांशी संपर्क साधून याप्रकरणातील मारेकऱ्यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर मोठी सुत्रे हलली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या सूचनेमुळे मानपाडा पोलीस ठाण्यातील त्या वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याच्या ताब्यातून वरिष्ठांनी तपास काढून तो अन्य अधिकाऱ्याच्या ताब्यात दिला. तसेच याप्रकरणातील गुन्ह्याची कलमे नंतर वाढविण्यात आली, अशी माहिती भाजप पदाधिकारी मनीषा राणे यांनी दिली.

रामनगर पोलीस ठाण्यात असाच प्रकार दोन वर्षापूर्वी दोन पोलीस अधिकाऱ्यांनी केला होतो. शासन निर्देशावरून हे दोन्ही अधिकारी कारवाईच्या कचाट्यात आहेत. तरीही पोलीस अशी गंभीर प्रकरणे हलक्याने घेत असल्याने तक्रारदार तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

बिकाशकुमार गणेश यादव (२४) हे या प्रकरणात तक्रारदार आहेत. ते केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेचा अभ्यास करतात. ते खोणी पलावा कासा एड्रियाना येथे आई रेणू यादव, मोठा भाऊ आकाशकुमार (२६), आजोबा राजेंद्र राय (७६), आजी मालतीदेवी (७०) असे एकत्र राहतात. बिकाशकुमारचे वडील पूर्वीपासून कुटुंबापासून विभक्त राहतात.

आजोबा राजेंद्र राय सेवानिवृत्त आहेत. त्यांना निवृत्ती वेतन मिळते. गेल्या आठवड्यात रात्री साडे बाराच्या सुमारास राजेंद्र राय हे रेणू यादव यांना म्हणाले, तुझा मुलगा बिकाशकुमार काहीच काम करत नाही. माझ्या निवृत्ती वेतनावर मी तुम्हाला किती दिवस पोसू. तसेच, माझ्या मोबाईलमधील पीन क्रमांक कोणी बदलला. आजोबांचा पीन मी आजोबांच्या सूचनेवरून बदलला असे आकाशकुमार म्हणाला.

या विषयावरून लहान भाऊ बिकाशकुमार आणि मोठा भाऊ आकाशकुमार या दोन्ही भावांमध्ये वादावादी होऊन त्याचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. स्वयंपाक घरातील तवा, लाटणे हाणामारीसाठी वापरले. बिकाशकुमार यावेळी गंभीर जखमी झाला. आई रेणू भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडली तर तिलाही आकाशकुमारने मारहाण केली. आजोबा राजेंद्र यांनी चामडी पट्टयाने रेणू यांना मारहाण केली, असे तक्रारीत म्हटले आहे.

यादव यांच्या घरातील भांडणाचा आवाज ऐकून सोसायटीतील लोकांनी हा वाद सोडविला. त्यावेळी घरात रक्ताचा सडा पडला होता. सदस्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलविले. पोलिसांना ही माहिती दिली.